अमृतसर – पंजाबच्या अमृतसरमधील विख्यात सुवर्ण मंदिरात माजी उप मुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल यांच्यावर आज सकाळी खालिस्तानी चळवळीशी संबंधित चौरा या वृध्द आंदोलकाने जीवघेणा हल्ला केला. हल्लेखोराने बादल यांच्यावर जवळून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र बादल यांच्या आसपास असलेल्या कार्यकर्त्यांनी हल्लेखोराला तत्काळ पकडल्याने बादल थोडक्यात बचावले.हल्लेखोराची ओळख पटली असून त्याचे नाव नारायणसिंग चौरा आहे. तो बब्बर खालसा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असून त्यांच्याविरूद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत.
सुखबीरसिंग बादल यांना अकाल तख्त साहीब या शिख धर्मियांच्या धार्मिक संस्थेने सुवर्णमंदिरात भाविकांची सेवा करण्याची शिक्षा दिली होती. मंगळवारपासून ते ही शिक्षा भोगत होते. आज शिक्षेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ते आपल्या सहकाऱ्यांसह सुवर्णमंदिराच्या प्रवेशद्वारावर भाविकांची सेवा (पहरेदारी) करीत होते. त्यांच्या पायाला फ्रक्चर झाले असल्याने ते व्हिलचेअरवर बसून सेवा करीत होते. अचानक गर्दीतून पुढे येत चौरा याने त्यांच्यावर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र आसपासच्या लोकांनी तत्परता दाखवत चौराला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. या झटापटीत चौरा याने एक गोळी झाडली . परंतु ती मंदिराच्या छताला लागली. पोलिसांनी तत्काळ बादल यांच्याभोवती सुरक्षा कडे बनवले.
हल्लेखोर नारायणसिंग चौरा हा खलिस्तानसमर्थक असून त्याने पंजाबमध्ये दहशतवादी कारवायांसाठी सहा वर्षे तुरुंगवास भोगला होता. त्याने खलिस्तानी चळवळ आणि पंजाबमधील दहशतवादावर पुस्तकेही लिहिली आहेत. चौरावर बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्यान्वये (युएपीए) गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात त्याला पोलिसांनी फरार आरोपी घोषित केले होते. बादल यांच्यावर हल्ला करण्याआधी चौरा काल सुवर्ण मंदिरात येऊन गेला होता. याची माहिती गुप्तवार्ता पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे आज सुवर्ण मंदिराच्या परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तरीही हा हल्ला झाला . बादल यांच्यावरील हल्ल्यामुळे राज्यात खळबळ उडाली. काँग्रेस आणि भाजपाने हल्ल्याचा तीव्र निषेध केला.तर शिरोमणी अकाली दलाने या हल्ल्याच्या न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे.