मुंबई – काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या दरे गावी विश्रांती घेतल्यानंतर आज अखेर मुख्यमंत्रिपदाबाबत मौन सोडले. दरे गावाहून ठाण्याकडे निघण्यापूर्वी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले की, माझी भूमिका मी यापूर्वीच स्पष्ट केली आहे. भाजपा, पंतप्रधान मोदी आणि अमित शहा हे जो मुख्यमंत्री ठरवतील त्याला माझा आणि शिवसेनेचा पाठिंबा राहील. उद्या भाजपाची बैठक आहे. त्यावेळी निवड केली जाईल. त्यामुळे कोणतीही चिंता करू नका.
महाराष्ट्रात महायुतीने घवघवीत यश प्राप्त केल्यानंतर 7 दिवस उलटून गेले तरीही मुख्यमंत्री कोण? मंत्रीकोण? कोणते खाते कुणाला? हे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न अनुत्तरीतच राहिले होते. त्यातच प्रसिद्धी माध्यमांशी काहीही न बोलता एकनाथ शिंदे सातार्याला दरे या आपल्या गावी निघून गेले. यामुळे महायुतीत मंत्रिपदे आणि खात्यावरून वाद असल्याचे चित्र निर्माण झाले होते. इतके घवघवीत यश मिळाल्यानंतरही हा साधा पेच का सुटत नाही? असा सवाल विरोधी पक्ष रोज विचारू लागले होते. आज मात्र या प्रश्नांची लवकरच उत्तरे मिळण्याची काहीशी आशा निर्माण झाली आहे.
आज दिवसभर अजित पवार हे कुठेच दिसले नाहीत. देवेंद्र फडणवीस हे आपल्या सागर बंगल्यावर बसून होते. रावसाहेब दानवेंपासून अनेक नेते सतत त्यांना भेटायला जात आहेत. आपल्याला मंत्रिपद मिळावे यासाठी नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: आज कोणतेच वक्तव्य केले नाही. दिल्लीतही हालचाल दिसली नाही. त्यातच एकनाथ शिंदे हे दरे गावावरून ठाण्याला आल्यानंतर फार मोठा निर्णय जाहीर करणार आहेत, अशी चर्चा सुरू झाली. या सर्व घडामोडींमुळे गोंधळ
वाढत गेला.
अखेर एकनाथ शिंदे यांनी दरे गावावरून निघण्यापूर्वी पत्रकारांशी चर्चा केली. यावेळी ते म्हणाले की, माझी तब्येत ठीक आहे. मी विश्रांतीसाठी गावी आलो होतो. गेले अडीच वर्षांत मी एकही सुट्टी घेतलेली नाही. मी दिवस-रात्र काम करत आहे. यामुळे थोडी विश्रांती घेण्यासाठी मी गावी आलो होतो. महायुतीत कोणतीही समस्या नाही. आम्हा तिन्ही पक्षांत पूर्ण समन्वय आहे. लाडक्या बहिणींमुळे आज आम्हाला प्रचंड असे यश लाभले आहे. लाडके भाऊ, लाडके शेतकरी यांनीही आम्हाला भरभरून दिले. आता आम्हाला काय मिळेल याचा विचार न करता जनतेला काय देऊ शकतो याचा विचार करायचा आहे. जनतेला जसे सरकार हवे आहे तसे सरकार आम्ही देणार आहोत. मी माझी भूमिका याआधीच स्पष्ट केली आहे. पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि भाजपा हे मुख्यमंत्रिपदाबाबत जो निर्णय घेतील त्याला माझे समर्थन असेल हे मी आधीच सांगितले आहे. उद्या भाजपाची बैठक आहे त्यात निवड होईल. त्यामुळे कोणतीही चिंता करू नका. विरोधकांना कोणतेही काम शिल्लक नाही. त्यांच्याकडे आता विरोधी पक्षनेताही उरलेला नाही. आता ते ईव्हीएमबाबत तक्रारी करीत आहेत. परंतु झारखंडमध्ये विजय मिळाला तिथे त्यांची ईव्हीएमबाबत तक्रार नाही. लोकसभेतही त्यांचा विजय झाला तेव्हा त्यांनी ईव्हीएमबाबत तक्रार केली नाही. आता त्यांना ईव्हीएमबाबत कितीही तक्रारी करूदे. न्यायालय आणि निवडणूक आयोग त्याबाबत निर्णय घेतील.
श्रीकांत शिंदेंबाबत
गूढ कायम राहिले
उपमुख्यमंत्री म्हणून श्रीकांत शिंदे यांचे नाव निश्चित झाले का, असे विचारता एकनाथ शिंदे गूढ कायम ठेवत म्हणाले की, चर्चा होणार आहे त्यात निर्णय होईल. गृह खात्याबाबतही त्यांनी म्हटले की, तिघांची चर्चा होऊन निर्णय होईल.