कराड- शहरातील कृष्णा नदीपात्रात असलेल्या ‘मढ्या मारुती ‘ म्हणजेच वीर मारुती मंदिराच्या पायाचा भराव उद्ध्वस्त झाला आहे. पायाचे दगड निखळले असून पाण्याच्या प्रवाहाबरोबर ते वाहून गेले आहेत.तसेच मंदिराभोवती दोन्ही बाजूंना मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे भविष्यात मंदिराला मोठा धोका निर्माण होणार आहे.
कृष्णा नदीपात्रात प्रीतीसंगमापासून पूर्वेला हे वीर मारुतीचे मंदिर आहे. त्यालाच ‘मढ्या मारुती’ म्हणूनही ओळखले जाते.हे मंदिर पूर्णपणे पात्रात आहे. त्यामुळे पावसाळ्यात नदीची पाणीपातळी वाढल्यानंतर तसेच टेंभू प्रकल्पात पाणी अडवल्यानंतर हे मंदिर पाण्यात जाते.वर्षातील किमान आठ ते नऊ महिने हे मंदिर पाण्यात असते. त्यामुळे भाविकांना मंदिरापर्यंत जाता येत नाही. मात्र,सध्या नदीची पाणीपातळी पूर्णपणे खालावली आहे. नदीचे पाणी सैदापूरच्या बाजूने प्रवाहित होत असून, वाळवंट पूर्णपणे रिकामे झाले आहे.त्यामुळे या मंदिरात भाविक दर्शनासाठी जात आहेत.नदीची पाणीपातळी खालावल्याने या मंदिराचा दगडी भराव मोकळा झाला असून या भरावाची दुर्दशा झाल्याचे दिसत आहे.