राज्यभरात गारठा वाढणार! निफाडचा पारा ८.८ अंशांवर

मुंबई- गेल्‍या काही दिवसांपासून गारठ्यात सातत्‍याने वाढ होत असून, पाऱ्यातील घसरण सुरूच आहे.काल पारा आणखी घसरला.काल निफाडचे किमान तापमान ८.८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पुढील दोन दिवसांत राज्यभरात गारठा आणखी वाढणार आहे.डिसेंबर महिन्यात तर कडाक्याची थंडी जाणवणार असल्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

राज्‍यातील प्रमुख शहरांच्‍या तुलनेत निचांकी तापमान सध्या नाशिकचे आहे.
वाढलेल्‍या गारव्‍याने जनजीवनावर परिणाम होत असून ग्रामीण भागासह शहरी भागातही दिनचर्या विलंबाने सुरू होत आहे. सकाळी सातपर्यंत वातावरणात धुक्‍याची दुलई पसरलेली दिसत आहे. विशेषतः नदीकाठच्‍या परिसरात धुक्‍याची अनुभूती अधिक प्रमाणात येत आहे. गारठ्यात वाढ होत आहे. मुंबईतही काल सकाळी किमान तापमान १६.८ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले.गेल्‍या काही दिवसांपासून पारा सातत्‍याने घसरत आहे. यंदाच्‍या हंगामात प्रथमच निफाडचे किमान तापमान एकआकडी पोहोचले आहे. मंगळवारी निफाडचे तापमान ८.८ अंश होते. येत्‍या काही दिवसांमध्ये पारा आणखी खालावून थंडीचा जोर वाढण्याची शक्‍यता आहे.