मुरादाबाद -उत्तर प्रदेशातील संभल येथील जामा मशिदीच्या सर्वेक्षणादरम्यान हिंसाचार भडकावणाऱ्यांवर पोलिसांनी आता कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणी समाजवादी पक्षाचे खासदार झियाउर रहमान बुर्क आणि स्थानिक आमदाराचा मुलगा सोहेल इक्बाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुर्क यांच्यावर सुनियोजित पद्धतीने हा हिंसाचार घडवून आणल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
संभलच्या शाही जामा मशिदीत काल जिल्हा न्यायालयाच्या आदेशानंतर सर्वेक्षणाचे काम सुरू होते. पाहणी सुरू असताना अचानक मोठ्या संख्येने लोक मशिदीबाहेर जमले आणि त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. यानंतर त्यांनी पोलिस पथकावर दगडफेक सुरू केली आणि वाहने पेटवून दिली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा आणि लाठीमार केला. या हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाला होता.दरम्यान, संभल परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. यासह परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये बाहेरील व्यक्ती, सामाजिक संस्था किंवा लोकप्रतिनिधींना अधिकाऱ्यांच्या आदेशाशिवाय परिसरात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी ३० नोव्हेंबरपर्यंत लागू करण्यात आली आहे. तसेच, संभल आणि परिसरातील शाळाही आज बंद ठेवण्यात आल्या आहेत.