कोल्हापूर- कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीच्या वाढीव हद्दीतील शहापूरच्या बालाजीनगर येथील खणीत मृत माशांचा खच पडला आहे. खणीच्या जवळच असलेल्या औद्योगिक वसाहतीतील केमिकलयुक्त पाणी खणीत मिसळल्यामुळे हे शेकडो मासे मृत पावले असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करीत आहेत.
शहापूर येथील बालाजी नगरच्या पश्चिम बाजूस असलेल्या खणीमध्ये मृत माशांचा खच पडला असून त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. सडलेल्या माशांच्या दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे पालिका आरोग्य विभागाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे खणीची स्वच्छता अद्याप झालेली नाही. पालिकेने खणीमधील मृत मासे आणि दूषित पाणी हटवून परिसराची स्वच्छता करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत. या खणीत जवळच असलेल्या औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांचे दूषित व केमिकलयुक्त पाणी थेट खणीमध्ये सोडण्यात येते. या दूषित पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे.आता या मृत माशांची दुर्गंधीही जाणवू लागली आहे.