सोलापूर – विधानसभा निवडणुकीसाठी उद्या बुधवारी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे.त्यामुळे निवडणुकीच्या कामाच्या निमित्ताने सोलापूर आगारासह विभागातील बहुतांश एसटी गाड्या या निवडणुकीच्या कामकाजात असणार आहेत. यामुळे लांब पल्ल्याच्या फेऱ्यासह अनेक फेऱ्या उद्या रद्द करण्यात आल्या असल्याची माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.
सोलापूर विभागात एकूण ७५० एसटी गाड्या आहेत. यातील जवळपास ६०० एसटी गाड्या प्रवासी वाहतुकीसाठी वापरण्यात येतात. निवडणुकीत जिल्ह्यातील बुथवर कर्मचाऱ्यांना ने-आण करण्यासाठी आयोगाला ४६० गाड्या पुरवण्यात आल्या आहेत. त्यामुळे सोलापूर विभागातील अनेक मार्गावर एसटीच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. १८ ते २० नोव्हेंबर दरम्यान एसटीच्या सातारा,कराड,कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड,वाई आदी लांब पल्ल्याच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांना याचा मोठा फटका बसणार आहे. सोलापूर दक्षिण, सोलापूर उत्तर २२, सोलापूर मध्य, मोहोळ या मतदारसंघासाठी या गाड्या देण्यात आल्या आहेत.