पुणे – पुण्यातील दिघी येथील लष्कराच्या तंत्रज्ञान संस्थेत अभियांत्रिकीचे शिक्षण घेणार्या अल्पवयीन मुलाने भरधाव मोटार चालवून एक रिक्षा आणि दोन दुचाकींना धडक दिली. या अपघातात रिक्षा चालकाचा मृत्यू झाला. तर, दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले. हा अपघात रात्री पावणेदहाच्या सुमारास पुणे – नाशिक महामार्गावर भोसरी येथे घडला.
अमोद कांबळे (२७) असे मृत्युमुखी पडलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. तर, गंभीर जखमी झालेल्या दुचाकीचालकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी मूर्तजा अमीरभाई बोहरा (३२) यांनी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अल्पवयीन मुलगा मुळचा आसामचा असून तो दिघीतील लष्करी तंत्रज्ञान संस्थेत अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षात शिकत आहे. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार नोंदवून घेतली. दरम्यान अल्पवयीन मुलाला किशोर न्यायमंडळासमोर हजर केले. न्यायमंडळाच्या सूचनेनुसार अल्पवयीन मुलाला बालनिरीक्षणगृहात पाठवले.