चेन्नई – तामिळनाडूमध्ये थुथुकुडी जिल्ह्यातील तिरुचेंदूर येथील सुब्रमण्यम स्वामी मंदिरात रविवारी हत्तीणीने तुडवल्याने दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांपैकी एक जण हत्तीचा माहूत होता. तर दुसरा माहुताचा नातेवाईक होता.
सुब्रह्मण्यम स्वामी मंदिरात धार्मिक विधीसाठी देवनाई नावाची हत्तीण असून मंदिराकडून देखभाल केली जाते. सणासुदीच्या वेळी हत्तीणीला दागिन्यांनी सजवण्यात येते. रविवारी दुपारी देवनाई तिच्या शेडमध्ये होती. यावेळी माहूत उदय कुमार आणि त्याचा नातेवाईक शिशूबालन हत्तीणीला फळे खाऊ घालत होते. अचानक हत्तीणीने दोघांवर हल्ला केला.यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.
वन अधिकारी रेवती रमण म्हणाले की, देवनाई २६ वर्षांची असून ती अतिशय शांत स्वभावाची आहे. तिच्याकडून अशा प्रकारची आक्रमक वर्तणूक यापूर्वी कधीही झालेली नाही. त्यामुळे आमच्या पशुवैद्यकीय तज्ज्ञांची टीमकडून तपासणी करून, प्रत्यक्षात काय घडले याचा तपास करू. आमची वैद्यकीय टीम हत्तीची आरोग्य स्थिती, वागणूक आणि इतर सर्व गोष्टी तपासणार आहे.