भुवनेश्वर – हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करून भारताने नवा इतिहास रचला आहे.ओडिशाच्या किनाऱ्यावरील डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावरून उच्च मारक क्षमता असलेल्या लांब पल्ल्याच्या या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज एक्स पोस्ट करून ही माहिती दिली. या चाचणीमुळे हायपरसॉनिक तंत्रज्ञान असलेल्या काही मोजक्या देशांच्या यादीत भारताचा समावेश झाला आहे. रशिया, चीननंतर या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करणारा भारत तिसरा देश ठरला आहे. हे तंत्रज्ञान अमेरिकेकडेही अद्याप नाही. या क्षेपणास्त्राची १,५०० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरापर्यंत पेलोड वाहून नेण्याची क्षमता आहे. ते ताशी सुमारे ६१७४ किमी वेगाने मारा करते. कोणत्याही प्रकारच्या एअर डीफेन्स यंत्रणेला या क्षेपणास्त्राचा शोध घेऊन त्याला हवेत नष्ट करता येत नाही.
