परभणी- राज्यात सोमवार १८ नोव्हेंबरपासून थंडीची लाट येणार आहे. तापमानात मोठी घट होऊन १२-१३ अंश सेल्सिअसपर्यंत पारा घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी थंडीमुळे आपल्या पिकांवर होणाऱ्या परिणामांपासून संरक्षण करण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी,असे आवाहन प्रख्यात हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी एका व्हिडिओद्वारे केले आहे.
हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांच्या ताज्या हवामान अंदाजानुसार सांगली,
सातारा,कोल्हापूर,सोलापूर जिल्ह्यातील जत परिसर तसेच कोकणातील रत्नागिरी,रायगड,सिंधुदुर्ग आणि गोवा या भागांमध्ये १५ ते १७ नोव्हेंबर दरम्यान हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.इतर भागांमध्ये मात्र हवामान कोरडे राहील.
विशेषतः द्राक्ष पट्ट्यातील शेतकऱ्यांनी पावसामुळे होणाऱ्या संभाव्य नुकसानीपासून बचाव करण्यासाठी औषध फवारणी काळजीपूर्वक करावी.राज्यभरात १८ नोव्हेंबरपासून थंडीचा जोर वाढणार आहे.या काळात हवामान कोरडे राहील . कुठेही पाऊस पडण्याची शक्यता नाही.कोकणात १९ नोव्हेंबरपासून थंडी वाढून धुके पडेल,दव पडेल.एकंदर राज्यातील ही कडाक्याची थंडी १० दिवस जाणवण्याची शक्यता पंजाबराव डख यांनी वर्तविली आहे.