ऋषिकेश – उत्तर भारतातील विविध शहरांमध्ये आज कार्तिकी पौर्णिमेनिमित्त लाखो भाविकांनी गंगा व शरयु नदीत स्नान केले. आज सकाळपासूनच उत्तर भारतातील गंगानदीच्या किनाऱ्यांवरील शहरांमध्ये लाखो भाविकांची उपस्थिती होती.
कार्तिकी पौर्णिमेच्या पर्वात गंगा स्नानाला मोठे महत्त्व असते. त्यामुळे आज वाराणसी, ऋषिकेश, प्रयागराज या ठिकाणी लोकांनी एकच गर्दी केली. अनेक मंदिरांमध्येही भाविकांची गर्दी होती . सर्वत्र मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आज पहाटे साडेचार वाजल्यापासून सुरु झालेले कार्तिक पौर्णिमेचे पर्व उद्या पहाटेपर्यंत आहे. वाराणसीत या निमित्ताने चौदाकोसी व पंचकोसी प्रदक्षिणाही करण्यात आली. विविध मंदिरात विशेष श्रीरामचरित मानस व भागवत कथापुराणांचे कार्यक्रमही आयोजित करण्यात आले होते. अयोध्येतही शरयू नदीवर भाविकांची मोठी गर्दी जमली होती. यामुळे विविध मार्गांच्या वाहतूकीत बदल करण्यात आला. कार्तिकी पौर्णिमेच्या निमित्ताने स्नान, उपवास व दान केल्याने मोक्ष प्राप्ती होते असे पुराणात सांगितलेले असून याच दिवशी शिवाने त्रिपुरासुर असूराचा वध केल्याची आख्यायिका आहे.