दिल्ली – ऑक्टोबर महिन्यातील किरकोळ किमतीवर आधारित महागाई ६.२ टक्के या ४ महिन्याच्या उच्चांकावर गेली असतानाच घाऊक किमतीवर आधारित महागाईचा दर ऑक्टोबर महिन्यात वाढून २.३६ टक्के या चार महिन्याच्या उच्चांकावर गेला आहे. अन्नपदार्थ, प्रामुख्याने भाज्या आणि उत्पादित वस्तूंचे दर वाढल्याने ही घाऊक महागाई वाढल्याचे दिसून येते.
घाऊक महागाईचा दरही अन्न घटकाच्या किमती वाढल्यामुळे वाढला आहे. रिझर्व बँक व्याजदर ठरवितांना घाऊक किमतीवर आधारित महागाई विचारात घेत नाही. तर किरकोळ किमतीवर आधारित महागाई विचारात घेते. किरकोळ किमतीवर आधारित महागाई काही महिने चार टक्क्याच्या आत राहिल्यानंतर रिझर्व बँकेकडून व्याजदर कपात अपेक्षित असते. मात्र या महागाईचा दर ६.२ टक्के वर गेला आहे.त्यामुळे डिसेंबर मध्येच नाही तर फेब्रुवारीमध्येही व्याजदर कपात होणार नाही असे समजले जात आहे.
या आठवड्याच्या सुरुवातीला जारी करण्यात आलेल्या ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आकडेवारीनुसार, खाद्यपदार्थांच्या किमतीत तीव्र वाढ झाल्याने किरकोळ महागाई १४ महिन्यांच्या उच्चांकी ६.२१ टक्क्यांवर पोहोचली आहे. ही पातळी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या दिलासादायक पातळीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे डिसेंबरमधील पतधोरण आढावा बैठकीत व्याजदरात कपात करणे कठीण होऊ शकते.महागाई विषयक धोरण तयार करताना प्रामुख्याने किरकोळ महागाईचा विचार करणाऱ्या आरबीआयने गेल्या महिन्यातील पतधोरण आढाव्यात रेपो दर ६.५ टक्क्यांवर कायम ठेवला आहे.