पाटणा – दरभंगा एम्स रुग्णालयाच्या पायाभरणी सोहळ्याच्याb व्यासपीठावर आज बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चरणांना स्पर्श केला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.भाषण संपल्यानंतर नितीश कुमार खुर्चीवर बसण्यासाठी जात असताना मध्येच थांबले आणि खाली वाकून नरेंद्र मोदी यांचा चरणस्पर्श करून त्यांना नमस्कार केला. त्यानंतर मोदी यांनी त्यांना आपल्या बाजूच्या खुर्चीवर बसवले. आपल्या भाषणात नितीश कुमार म्हणाले की, आमच्या अपेक्षेपेक्षा मोदी चांगले एम्स रुग्णालय बांधतील. २००३ मध्ये वाजपेयी यांच्या सरकारने दरभंगा येथे एम्स बांधण्याचा निर्णय घेतला होता. एम्सच्या बांधकामानंतर लोकांना फायदा होईल. या भागाचा विकास होईल. दरभंगा मेडिकल कॉलेजचाही विस्तार करणार असून यामध्ये २५०० खाटांची व्यवस्था करणार आहोत.याआधी ८ जून रोजी दिल्लीत झालेल्या एनडीएच्या बैठकीतही नितीश कुमार यांनी मोदींच्या पायाला स्पर्श केला होता. तर ३ नोव्हेंबर रोजी पाटणा येथे त्यांनी माजी खासदार आरके सिन्हा यांना चरणस्पर्श केला होता.
