बंगळुरू – भारतीय अवकाश संशोधन संस्था ‘इस्रो’ने २०२८ मध्ये ‘चांद्रयान-४’ या मोहिमेची घोषणा केली आहे.या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे त्यावेळी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील पाण्याचा बर्फ मोठ्या प्रमाणात असलेल्या भागातून तीन किलो वजनाचे खडक-मातीचे नमुने गोळा करून ते अभ्यासासाठी पृथ्वीवर आणण्यात येणार आहेत.
भारत सरकारने या मोहिमेला आधीच वित्तीय मंजुरी दिलेली आहे.या मोहिमेसाठी २१ अब्ज रुपये खर्च येणार आहे. या मोहिमेबाबत ‘इस्रो’चे अध्यक्ष एस.सोमनाथ आशावादी आहेत. जे आतापर्यंत रशिया,अमेरिका किंवा चीन आदी देशांनी करून दाखवले आहे ते या मोहिमेत या मोहिमेत भारतही करून दाखवेल, असा त्यांना विश्वास आहे. ‘एलव्हीएम-३’ या शक्तिशाली रॉकेटच्या साहाय्याने ‘चांद्रयान-४’ रवाना होईल.त्यामध्ये एक लँडर आणि खडक-मातीचे नमुने गोळा करणारे छोटे वाहन असेल. हे असेंडर व्हेईकल नमुने गोळा करून चांद्रभूमीवरून उड्डाण करील. ते हे नमुने ‘रिएंट्री’ मॉडेलमध्ये ठेवेल जे नंतर पृथ्वीवर परत येईल. चांद्रयान-४ चे लँडर ज्याठिकाणी चांद्रयान-३ उतरले होते, त्या ‘शिवशक्ती पॉईंट’जवळच उतरेल, असे म्हटले जाते. या मोहिमेनंतर ‘चांद्रयान-५’ मोहीम होईल. ती जपानच्या सहकार्याने होणार आहे.त्यावेळी ३५० किलो वजनाचे रोव्हर चांद्रभूमीवर पाठवले जाणार आहे.