कोल्हापूर – कोल्हापूरच्या प्रसिद्ध अंबाबाई मंदिरात उद्यापासीन ते सोमवार ११ नोव्हेंबर या कालावधीत किरणोत्सवातील दक्षिणायन सोहळा होणार आहे. अंबाबाईच्या भक्तांसाठी ही मोठी पर्वणी असते.
हेमाडपंथी बांधकामातील पश्चिमाभिमुख अंबाबाई मंदिराच्या गर्भकुडीपर्यंत अस्ताला जाणारा सूर्य वर्षातून दोन वेळा सलग तीन दिवस किरणोत्सवाची परिक्रमा करतो. किरणोत्सवामुळे कोल्हापुरच्या अंबाबाई मंदिराला जगभरात वैशिष्ट्यपूर्ण मंदिर अशी ओळख मिळाली आहे. अस्ताला जाणाऱ्या सूर्याची थेट किरणे देवीच्या चरण, कंबर व मुखावर नैसर्गिकरीत्या पडतात. वर्षातून दोनवेळा सहा दिवस अंबाबाई मंदिरात किरणोत्सवाची पर्वणी अनुभवता येते. दक्षिणायन आणि उत्तरायण अशा दोन कालखंडात हा सोहळा होतो. दक्षिणायनच्या परिघात ९ ते ११ नोव्हेंबर तर उत्तरायणच्या काळात ३१ जानेवारी व १ ते २ फेबवारी असा हा किरणोत्सवाचा अनोखा सोहळा पार पडतो. प्राचीनकाळी अंबाबाई मंदिरात पाच दिवसांचा किरणोत्सव होत असल्याचे दाखले मिळाले आहेत.