कुडाळमध्ये १५ ते १७ दरम्यान घरातून मतदान करता येणार

*६३४ वृद्ध,दिव्यांगांना
मतदानाचा हक्क

सिंधुदुर्ग – भारत निवडणूक आयोगाने ८५ वर्षांपुढील व जे दिव्यांग मतदार मतदान केंद्रापर्यंत जाऊ शकणार नाहीत, त्यांच्यासाठी गृहमतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार कुडाळ विधानसभा मतदारसंघात ६३४ मतदारांनी निवडणूक यंत्रणेकडे अर्ज भरून दिले आहेत. या मतदारांसाठी १५ ते १७ नोव्हेंबरला संबंधितांच्या घरी जाऊन मतदान घेण्यात येणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुशे यांनी दिली.दरम्यान, ही मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी तब्बल ३५ पथके तयार करण्यात आली आहेत.

या मतदारसंघातील ८५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे आणि दिव्यांग मतदारांची आपापल्या कार्यक्षेत्रातील बीएलओंनी नोंद करून अर्ज भरून घेतले आहेत. यापैकी मतदान केंद्रात जाऊन मतदान करणे शक्य नसलेल्या मतदारांची संख्या ६३४ एवढी आहे. यात ८५ वर्षांवरील ५७४ मतदार असून ६० दिव्यांग मतदारांचा समावेश आहे. या सर्व दिव्यांग व वृद्ध मतदारांच्या घरी जाऊन मतदान घेतले जाणार आहे. यासाठी कुडाळ मतदारसंघात १५ ते १७ नोव्हेंबर दरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ही प्रक्रिया राबविण्यात येईल.त्यासाठी ३५ पथके तयार करण्यात आली आहेत.या प्रत्येक पथकामध्ये दोन मतदान अधिकारी, एक पोलिस कर्मचारी, एक सूक्ष्म निरीक्षक तर एक व्हीडीओग्राफर यांचा समावेश असणार आहे. कुडाळ मतदारसंघातील ज्या ८५ वर्षावरील व दिव्यांग मतदारांनी गृहमतदानासाठी नोंद केली आहे,त्यांनी याची नोंद घेऊन आपला मतदानाचा हक्क बजवावा.तसेच यादिवशी मतदार अनुपस्थित असल्यास त्यांना गृहमतदानाची संधी नसेल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी दिली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top