किव- रशिया बरोबरच्या युद्धात आज युक्रेनच्या सैन्याचा सामना पहिल्यांदाच उत्तर कोरिया लष्कराच्या एका तुकडी बरोबर झाल्याचे युक्रेनच्या संरक्षण मंत्र्यांनी म्हटले आहे.
युक्रेनच्या एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा आरोप केला. आज उत्तर कोरियाच्या एका लहान तुकडीने युक्रेनच्या सैन्यावर हल्ला केल्याचेही त्यांनी सांगितले.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी या आधी पश्चिमेतील देश उत्तर कोरियाच्या हालचालींकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला होता. उत्तर कोरिया सैन्याच्या तुकडीचा सहभाग जागतिक स्थैर्याला धोका असल्याचेही त्यांनी म्हटले होते. युक्रेनच्या कुर्स्क सीमेवर किमान ११ हजार उत्तर कोरियन सैन्य जमा झाल्याचेही युक्रेनने म्हटले आहे. दक्षिण कोरिया व अमेरिकेच्या गुप्तचर संघटनेनेही या युद्धात उत्तर कोरियाच्या सैन्य सहभागाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.