अल्मोडा- उत्तराखंडमधील अल्मोडा येथे आज सकाळी ८ वाजता एक प्रवासी बस १५० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात ३६ जणांचा मृत्यू झाला, तर ६ जण जखमी झाले. अल्मोडा येथील कुपीजवळ हा अपघात झाला. बसमध्ये ४२ प्रवासी होते. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी १ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
ही नैनी डांडामधील बस किनाथहून रामनगरकडे जात होती. त्यात बहुतांश स्थानिक लोक प्रवास करत होते. अल्मोडा जिल्ह्यातील मार्चुलाजवळ बसचे नियंत्रण सुटले आणि बस दरीत पडली. दरीत कोसळताना बसला अनेक धक्के लागल्याने अनेक प्रवासी खिडक्याबाहेर फेकले गेले. अपघाताची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन, पोलीस, एसडीआरफ आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल होऊन बचावकार्य सुरु केले. यात २८ जणांचा जागीच मृत्यू झाला तर ८ जणांचा रुग्णालयात मृत्यू झाला. तर ६ जण जखमी झाले. जखमींवर आता रामनगर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.