मुंबई- विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचे आर्थिक व्यवहार बाहेर काढून त्यांना भाजपाकडे वळवण्याचे कार्य करणारे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी विक्रांत वाचवा मोहिमेतील ५७ कोटी कुठे खर्च केले. याची चौकशी करण्याचे आदेश मुंबई न्यायदंडाधिकारी न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी न्यायालयात क्लोझर रिपोर्ट सादर केला आहे. या प्रकरणी सोमय्या यांच्यावर झालेले आरोप खरे किंवा खोटेही असू शकतात असे त्यात म्हटले आहे. रिपोर्ट मध्ये सोमय्या व त्यांचा मुलगा निल सोमय्या यांच्याबाबत निर्णयच दिलेला नाही .
भारतीय नौदलातील ऐतिहासिक आयएनएस ही विमानवाहू युद्धनौका १९९७ मध्ये भारतीय नौदलाच्या ताफ्यातून सेवानिवृत्त झाली. भारतीय नौदलातील सर्वात शक्तीशाली असलेल्या या नौकेचे स्मारक तयार करण्यासाठी किरीट सोमय्या यांनी २०१३ – १४ या आर्थिक वर्षात लोकांकडून तब्बल ५७ कोटी रुपये गोळा केले. हे गोळा केलेले पैसे कोणत्याही सरकारी किंवा मान्यताप्राप्त संस्थेत त्यांनी जमा केले नाहीत. अशी तक्रार एका निवृत्त नौदल अधिकाऱ्यांनी केली होती. या प्रकरणी आता पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या सारांश अहवालात म्हटले आहे की, या नौदल अधिकाऱ्याने केलेले आरोप खरे आहेत की खोट आहेत हे सांगता येत नाही. या आधीही सोमय्या यांनी हे प्रकरण रद्द करण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. मात्र आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा नीट तपास केला नाही असे सांगत न्यायालयाने ती विनंती फेटाळली होती.
या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात न्यायदंडाधिकारी न्यायालयाने मुंबई पोलिसांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यावर पोलिसांनी क्लोजर अहवाल सादर केला. न्यायालयाने तोही अहवाल फेटाळला असून हा निधी नेमका कुठे खर्च झाला आहे हे शोधून काढण्याचे आदेश पोलिसांना दिले होते . त्यानंतर आलेल्या अहवालातही ठोस निर्णय नाही .