मुंबई – एेन दिवाळीच्या काळात तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. आजपासून १९ किलोचे व्यावसायिक गॅस सिलिंडर दर ६२ रुपयांनी महागला आहे. यामुळे हॉटेलमधील खाद्यपदार्थांच्या किमतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली तरी तेल कंपन्यांनी १४ किलोंच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ केलेली नाही. मात्र, आगामी काळात विमानप्रवासदेखील महागण्याची शक्यता आहे. कारण तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरासोबतच विमान इंधनाच्या किमतीमध्येदेखील वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत मुंबईत १७५५, दिल्ली १८०२, कोलकाता १९११, चेन्नई १९६५ रुपये आहे. व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीमध्ये गेल्या चार महिन्यांत १५० रुपयांहून अधिक वाढ झाली आहे. दिल्लीमध्ये या काळात व्यावसायिक सिलिंडर १५६ रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या चार महिन्यांत व्यावसायिक सिलिंडरच्या दरामध्ये १५६.५ रुपयांनी वाढ झाली आहे.
