मनसे निवडणूक स्वतंत्र लढणार सत्तेत येणार! राज ठाकरेंची घोषणा

मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन करताना सर्वच पक्षांवर आसूड ओढत मनसेला मत देण्याचे आवाहन करीत जाहीर केले की, मनसे एकट्याने निवडणूक लढवून सत्तेत येणार आहे. राज ठाकरे म्हणाले की, गेली पाच वर्षे फोडाफोडी सुरू आहे. ते आवडते की, सरळ, सभ्य, विकासाचा विचार करणारा राजकारणी आवडतो हे ठरवायचे आहे. आज नीट निवड केली नाही तर महाराष्ट्र बरबाद होईल. पक्ष बदलत सुटले आहेत त्यांना मतदान करणार आहात?
उद्धव ठाकरे इतिहासातून बाहेरच येत नाहीत. अब्दाली, अफझलखानच बोलतात. महाराष्ट्राबद्दल बोलत नाही. दुसरा तो पुष्पा, एकनाथ शिंदे, शरद पवार म्हणतात की, त्यांचा पक्ष फोडला. त्यांनी आयुष्यभर तेच केले. त्यांनी पक्ष फोडाफोडीचे राजकारण करण्याशिवाय काय केले. 1978 मध्ये काँग्रेस फोडली. 1991 मध्ये शिवसेना फोडली. त्यानंतर नारायण राणे यांना फोडले. आता तुम्ही कसल्या फोडाफोडीच्या गोष्टी बोलत आहात. अजित पवार आता गुलाबी जॅकेट घालून फिरतात. ते भाजपात येण्याच्या सात दिवस आधी मोदी म्हणतात त्यांना जेलमध्ये टाकू. जेलऐवजी त्यांना मंत्रिमंडळात टाकले. हे सर्व जनतेला गृहीत धरून चालले आहे. पैसे फेकायचे आणि मते घ्यायची. लाडकी बहीण योजनेचे पैसे पुढच्या महिन्यापासून येणार नाहीत, हे मी लिहून देतो. जानेवारी महिन्यापासून पगाराला पैसे उरणार नाहीत.
या राज्यात कुणी फुकट मागत नाही, यांनाच सवयी लावायच्या आहेत, एकाने केले की सर्वांना करावे लागते, यातून महाराष्ट्र नागडा होणार आहे.
माझ्या महाराष्ट्रात मी प्रत्येकाच्या हाताला काम देईन, पण ते जातीनुसार दिले जाणार नाही. मराठा आरक्षण मिळू शकणार नाही हे सर्वांना माहीत आहे. पण हे सत्य बोलण्याचे धाडस राज ठाकरे करतो आहे. हे आरक्षण देऊच शकत नाहीत. सर्व राज्यातील जाती डोकी वर काढतील. हे भूलथापा टाकत आहेत. निवडणूक झाली की हा विषय संपेल. तामिळनाडूने केले तो विषय कोर्टात रेंगाळतो आहे. त्याचा निर्णय झालेला नाही.
समुद्रात शिवाजी महाराजांचा पुतळा बसवायचा होता. विनायक मेटे यांनी मागणी केली होती. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा दोन इंच उंच पुतळा हवा. कोण त्यांच्या डोक्यात घालते माहीत नाही. मी तो पुतळा पाहिला. फ्रान्स सरकारने अमेरिकेला दिला होता. तो दगडी आयलँडवर आहे. आता एवढा उंच पुतळा झाला. मला शिल्पकला माहीत आहे. तर घोडा केवढा झाला? तुम्ही म्हणाल पटेलांचा पुतळा झाला. एका बाजूला चीनला विरोध करायचा. चीनचे प्रॉडक्ट घेऊ नका म्हणून सांगायचे आणि चीनमधून पटेलांचा पुतळा आणायचा. समजा उद्या पुतळा बनवला, तर पहिल्यांदा समुद्रात भर किती घालावी लागेल? सिंधुदुर्गातील पुतळा वार्‍याने पडला. तो काही फार मोठा नव्हता. शिल्पकला ही गोष्ट समजून घ्या. नुसता पुतळा उभा करायचा नसतो. उद्या समुद्रातील भराव खचला. पुतळा हलला तर? भराव टाकून पुतळा उभा करायचा असेल तर किमान 15 ते 20 हजार कोटी खर्च करावे लागतील. समुद्रात पुतळा उभा करण्यापेक्षा हे 15 ते 20 हजार कोटी गडकिल्ल्यांवर खर्च केले तर राजा कोण होता, त्याने काय बांधले हे सांगता येईल.
या राजकारण्यांपासून सावध राहा. हे निवडणुकीत पैसे वाटतील ते घ्या आणि मनसेला मत द्या. अदानी येतो, सगळे घेऊन टाकतो. कोकणात जमीन घेतात. लहान मुलांवर बलात्कार होत आहेत, सरकारचा धाक नाही, हे सुराज्य आहे का? स्वराज्य आहे का? महाराष्ट्र अधोगतीला लागला आहे. सर्वजण कसे फसवतात याकडे लक्ष ठेवा. या निवडणुकीत ना युत्या, ना आघाड्या. आपण स्वतंत्रपणे महाराष्ट्राला सामोरे जाणार आहोत. निकालानंतर मनसे हा सत्तेतील पक्ष असेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top