मुंबई – महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमधील तीनही घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी आज निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खास पहिली संयुक्त पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत मविआच्या नेत्यांनी ‘गद्दारांचा पंचनामा’ प्रकाशित करून महायुती सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली. आगामी विधानसभा निवडणूक तिन्ही पक्ष एकत्रच लढवणार असल्याचे अधिकृतपणे जाहीर केले. मविआच्या नेत्यांनी सांगितले की, महायुती सरकार हे कायदा सुरक्षा, प्रशासन या सर्व बाबतीत अपयशी ठरले आहे. त्यामुळे राज्यातील जनतेला परिवर्तन हवे आहे. हे सरकार आता घालवावेच लागेल. यासाठी आम्ही एकजुटीने प्रयत्न करणार आहोत.
या पत्रकार परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खा. वर्षा गायकवाड, खा. संजय राऊत, खा.अरविंद सावंत, खा.सुप्रिया सुळे, खा.अनिल देसाई, आ.आदित्य ठाकरे उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले की, मी सतत महाराष्ट्रात हिंडतो आहे. माझे इतर सहकारीही फिरत आहेत. माझे निरीक्षण असे आहे की, लोकांना परिवर्तन हवे आहे. लोकसभेच्या निकालाआधी कोणी मान्य करत नव्हते. पण निकाल आला. आम्ही 31 जागा जिंकलो. याचा अर्थ लोकांना बदल हवा होता. महायुती सरकारने मंत्रिमंडळात तीन महिन्यांत धडाधड निर्णय घेतले. पण त्यातील किती निर्णयांची अंमलबजावणी होईल? महाराष्ट्राच्या प्रशासनाचा देशात लौकिक होता. पण महायुती सरकारच्या काळात ही प्रशासकीय व्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे, त्याची महाराष्ट्राला मोठी किंमत मोजावी लागत आहे. प्रशासन व्यवस्था उद्ध्वस्त करणार्यांच्या हातून महाराष्ट्र वाचवावा लागेल. त्यासाठी मविआ प्रयत्न करत आहे. सरकारने विविध जाती-समाजांसाठी महामंडळे स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वीही सरकारने काही महामंडळे नेमली होती. त्याची उपयुक्तता नाही. त्याचा प्रशासकीय खर्च आहे. काही महामंडळे रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हे नियोजन खात्याने सरकारच्या लक्षात आणून दिले आहे. त्यानंतरही रोज नवीन महामंडळ केली जात आहे, त्याला काही अर्थ नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोहरादेवी दौरा केला होता. त्यावेळी पंतप्रधानांनी असे विधान केले होते की, बंजारा समाजासाठी काँग्रेसने आणि यापूर्वीच्या सरकारने काहीच केले नाही. परंतु वसंतराव नाईक 11 वर्षे तर सुधाकरराव 3 वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. मनोहर नाईक मंत्रिमंडळात होते. काँग्रेसने बंजारा समाजाला राज्याचे नेतृत्व करण्याची संधी दिली. बंजारा समाज त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. पण मोदी येऊन चुकीची माहिती देतात. पंतप्रधानपद ही एक संस्था आहे. पण त्याची प्रतिष्ठा राखली जात नाही, अशीही टीका पवारांनी केली.
उद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्र मोदी-शहा यांच्या गुलामांची वसाहत झाली आहे, अशा पद्धतीने सरकार चालवले जात आहे. आगामी निवडणुकीत हे सरकार घालवावेच लागेल. सर्व बाबतीत बोजवारा उडाला आहे. दोन पोलीस कमिशनर असणारे मुंबई देशातील एकमेव शहर असेल. लाडक्यांना कमिशनर करा, पण कारभाराचे काय? महिला, राजकारणी, सत्ताधारी पक्षातील नेते असुरक्षित आहेत. मग सामान्य जनतेचे काय? पोलिसांचा वापर गद्दारांच्या सुरक्षेसाठी केला जात आहे. सामान्य माणसाच्या सुरक्षेसाठी किती पोलीस आहेत आणि गद्दारांच्या सुरक्षेसाठी किती पोलीस आहेत? याची माहिती आरटीआयमधून बाहेर काढली पाहिजे. त्यामुळेच मी उपरोधिकपणे म्हणतो की, सत्ताधार्यांच्या घरात धुणी-भांडी करणार्यांनाही सुरक्षा पुरवली गेली आहे. गद्दारांना, त्यांच्या कुटुंबियांना दिलेली सुरक्षा काढून जनतेसाठी का वापरत नाहीत? सिनेसृष्टीतील आघाडीच्या कलाकारांना घेऊन जाहिराती सुरू आहेत. हे सर्व कुणाचे पैसे आहेत? तुम्ही जाहिरातीवर उधळणारा पैसा जनतेच्या सुरक्षेसाठी का लावत नाही? आगामी निवडणुकीच्या प्रचारात असे अनेक मुद्दे मांडणार आहोत. निष्क्रीय, भ्रष्टाचारी सरकारबाबत आज गद्दारांचा पंचनामा, आरोपपत्र जनतेच्या न्यायालयात मांडत आहोत. जनता या सगळ्याचा न्यायनिवाडा करील, अशी आम्हाला खात्री आहे. शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्राला मी मोदी-शहांचा गुलाम होऊ देणार नाही.
नाना पटोले यांनी माजी मंत्री आमदार बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा संदर्भ देत राज्यातील कायदा व सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले की, शाळेतील मुली सुरक्षित नाहीत, महिला सुरक्षित नाहीत, राज्यातली जनता सुरक्षित नाही, आता तर सत्तेतील लोकही सुरक्षित नाहीत. कायदा-सुव्यवस्था बिघडली आहे. आता महायुतीच्या मंत्र्यांचे राजीनामे मागितले जाणार नाहीत, तर जनताच यांना सत्तेतून खाली खेचेल. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना असंवैधानिक पद्धतीने पदावर बसवले आहे. काँग्रेसने त्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. राजकीय फायद्यासाठी सत्ताधारी पक्ष त्यांच्या विचारांच्या अधिकार्यांना महत्त्वाच्या पदावर बसवून लोकशाहीचा खून करण्याचे काम करत आहे.
महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असा प्रश्न विचारला असता, तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी बोलणे टाळले आहे. आधी महायुतीने मुख्यंमत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा, ते गद्दाराच्या नेतृत्वात निवडणुका लढविणार का? हे जाहीर करावे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तर आमच्यासाठी मुख्यमंत्रिपद महत्त्वाचे नाही, तर राज्याच्या जनतेचे हित महत्त्वाचे आहे, अशी भूमिका शरद पवार आणि नाना पटोले यांनी घेतली.