कल्याण- गरबा बघण्यासाठी गेलेल्या दहावीतील विद्यार्थ्यांचा ट्रान्सफॉर्मरच्या वायरचा शॉक लागून मृत्यू झाला. कल्याणच्या खडकपाडा परिसरात काल रात्री ही दुर्घटना घडली.
या दुर्घटनेतील मृत मुलाचे नाव कमलाकर खंडू नवाळे (१५) असे असून तो इयत्ता दहावीत शिकत होता. नवरात्री उत्सवानिमित्त कल्याणच्या खडकपाडा परिसरात गरबा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.याच परिसरात राहणारा कमलाकर गरबा पाहण्यासाठी गेला होता.कमलाकर हा गरबा पाहण्यासाठी रस्त्यालगत असलेल्या ट्रान्सफार्मरच्या भिंतीवर चढला.परिसरातील लोकांनी हा प्रकार पाहिला. त्यांनी तातडीने कमलाकरला खाली उतरण्यास सांगितले.मात्र, भिंतीवरून खाली उतरत असताना त्याचा तोल गेला आणि त्याचा हात ट्रान्सफॉर्मरच्या वायरला लागला.त्याचवेळी त्याला विजेचा जोरदार धक्का बसला.काही क्षणातच कमलाकर भिंतीवरून खाली कोसळला.स्थानिकांनी त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले.मात्र, रुग्णालयात पोहोचण्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे खडकपाडा परिसरात शोककळा पसरली आहे.