नवी दिल्ली – बलात्काराच्या आरोपामुळे दाक्षिणात्य तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कोरिओग्राफर जानी मास्टर याला जाहीर झालेला राष्ट्रीय पुरस्कार स्थगित करण्यात आला आहे. त्याला दिल्लीत होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित राहण्यासही मनाई करण्यात आली आहे.
जानी मास्टर याच्यावर त्याच्या एका महिला सहकाऱ्याने वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. या आरोपामुळे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच जानी मास्टर फरार झाला होता. त्याला १९ सप्टेंबर रोजी सायबराबाद पोलिसांनी गोवा राज्यातून अटक केली.
जानी मास्टर याला तिरुचित्रंबलम या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफर म्हणून राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला होता. ८ ऑक्टोबर रोजी दिल्लीतील विज्ञान भवनात पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे.मात्र आता जानी मास्टर यांच्याविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने पुरस्कार देण्याबाबतचा निर्णय स्थगित केला.