नाशिक- आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत पाठोपाठ आंतरराष्ट्रीय रोईंगपटू दत्तू भोकनळ राज्य सरकारच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. राज्य सरकारकडून उत्तर महाराष्ट्रच्या खेळाडूंवर अन्याय होत असल्याचा आरोप दत्तू भोकनळने केला आहे. दरम्यान, मागील महिन्यात ११६ खेळाडूंना क्रीडा प्रशिक्षकपदाची नोकरी देण्यात आली. त्यातही दत्तूला स्थान देण्यात आलेले नाही.
काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांना राज्य सरकारकडून सरकारी नोकरी देण्यात आली. मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारीपदी कविता राऊत हीची नियुक्ती करण्यात आली. मात्र या नियुक्तीवर कविता राऊत समाधानी नाही. राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात ती न्यायालयात जाणार आहे. आता दत्तू भोकनळही न्यायालयात याचिका दाखल करणार आहे
राज्य सरकारकडून उत्तर महाराष्ट्राच्या खेळाडूंवर अन्याय होत आहे. २०१७ ला नोकरीसाठी अर्ज करुन देखील शासनाकडून कुठलीही दखल घेण्यात आलेली नाही. मंत्री छगन भुजबळ यांनी पाठपुरावा करून देखील सरकार याबाबत दखल घेत नाही. ललिता बाबरला एक न्याय आणि इतरांना दुसरा न्याय दिला जात आहे. त्यामुळे मी सरकारविरोधात न्यायालयात याचिका दाखल करणार आहे, असे दत्तू भोकनळ याने सांगितले.