मुंबई – मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा निकाल आज अखेर जाहीर झाला आणि ठाकरे गटाने या निवडणुकीत 10 पैकी 9 जागांवर विजय खेचत दणदणीत यश मिळवले. जवळजवळ दोन वर्षांनी या निवडणुका पार पडल्या. आतापर्यंत दोनवेळा या निवडणुका घोषित झाल्या होत्या. मात्र प्रत्येकवेळी विद्यापीठाने ऐनवेळी निवडणुका रद्द केल्या. अगदी आजपर्यंत हा विषय न्यायालयात सुरूच होता.
मुंबई विद्यापीठात ठाकरे गटाची युवासेना आणि अभाविप अशीच लढत होत होती. दोघांनीही एकमेकांवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप केले. मतदार यादीत घोळ केल्याचे आरोपही एकमेकांवर झाले. त्यातच या निवडणुकीशी काडीमात्र संबंध नसलेल्या शिंदे गटाने आणि मनसेने या निवडणुकीविरोधात कोर्टात धाव घेत एकदा निवडणूक रद्द केली. त्यानंतर 22 सप्टेंबर रोजी मतदानाची घोषणा झाली. मात्र तेव्हाही विद्यापीठाने अचानक मतदान स्थगित केले. यावेळी ठाकरे गटाने कोर्टात धाव घेतल्यानंतर कोर्टाच्या
निर्देशानुसार मंगळवारी मतदान घेण्यात आले. आज सकाळीही अभाविपने कोर्टात धाव घेऊन युवासेनेच्या अल्पेश भोईर या उमेदवाराच्या विरोधात अर्ज दाखल केला. मात्र कोर्टाने मतमोजणी स्थगित करण्यास नकार दिला.
आज सकाळी मतमोजणी सुरू झाल्यानंतर काही काळातच ठाकरे गटाचे वर्चस्व स्पष्ट झाले. ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्त्वाखाली ही निवडणूक यशस्वीपणे लढली गेली. सिनेटच्या सर्व जागा आम्ही जिंकणारच असे पूर्ण आत्मविश्वासाने आदित्य ठाकरे, अनिल परब आणि संजय राऊत हे रोज म्हणत होते. त्यांचा आत्मविश्वास रास्त ठरला. राखीव गटात युवासेनेचे ओबीसी प्रवर्गाचे उमेदवार मयूर पांचाळ हे 5,300 मतांनी विजयी झाले, अनुसूचित जमाती प्रवर्गातून धनराज कोहचाडे हे 5,247 मतांनी विजयी झाले, महिला प्रवर्गातून 5,914 मतांनी स्नेहा गवळी विजयी झाल्या, अनुसूचित जाती गटातून शीतल शेठ देवरूखकर या 5,498 मतांनी विजयी झाल्या, भटक्या विमुक्त प्रवर्गातून शशिकांत झोरे यशस्वी झाले. राखीव कोट्यातील या सर्व पाच जागा युवासेनेने जिंकल्या. खुल्या वर्गात युवासेनेचे मिलिंद साटम, प्रदीप सावंत, अल्पेश भोईर आणि परमात्मा यादव हे विजयी झाले. सिनेट निवडणुकीत 13 हजार मतदारांपैकी 7,238 मतदारांनी मतदान केले होते. मतदानाचा टक्का साधारण 50 टक्के इतका होता.