शिमला – भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हिमाचल प्रदेशातील धार्मिक पर्यटनाला चालना देणाऱ्या महत्वाकांक्षी बिजली महादेव मंदीर रोपवे प्रकल्पाला भाजपच्या नवनिर्वाचित खासदार अभिनेत्री कंगना रानौत हिने विरोध केला आहे. त्यामुळे कंगना भाजपासाठी पु्न्हा डोकेदुखी ठरली आहे.
हिमाचल प्रदेशच्या कुल्लू मध्ये सहा महिन्यांपूर्वी गडकरी यांच्या हस्ते बिजली महादेव मंदीर रोपवे प्रकल्पाचा शिलान्यास करण्यात आला होता. या प्रकल्पामुळे रोज ३६००० पर्यटकांना रोपवेच्या साह्याने बिजली महदेव मंदिरा पर्यंत जाता येणार आहे. सध्या तिथे जाण्यासाठी २ ते ३ तास लागतात. त्यामुळे हा प्रकल्प भाविकांच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. मात्र या प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे.त्यांनी अनेक वेळा रस्त्यावर उतरून या प्रकल्पाला विरोध केला आहे. त्यामुळे स्थानिकांची बाजू घेत कंगना रानौतनेही प्रकल्पाला विरोध केला आहे. तिने याबाबत गडकरींची भेट घेतली आहे. या प्रकल्पामुळे आमच्या देवी देवता नाराज होतील तसेच स्थानिकांचा रोजगार बुडेल असे गडकरीना सांगितले. मात्र गडकरींनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला . पण ती एकत नसल्याने हा वाद चिघळणार आहे. परिणामी या प्रकल्पाचे भवितव्य रोपवे प्रमाणेच अधांतरी लटकले आहे.