मुंबई – बदलापूरच्या प्रसिद्ध शाळेत दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या अक्षय शिंदे याला एन्काउंटर स्पेशालिस्ट संजय शिंदे व सहकारी पोलिसांनी पोलीस गाडीत गोळ्या झाडून ठार केले, असा गंभीर आरोप होत असतानाच मनसेच्या नेत्या शर्मिला ठाकरे यांनी ‘बेकायदेशीर काम केल्याबद्दल’ दोघा पोलिसांचा सन्मान करीत त्यांना प्रत्येकी 50 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले. इतकेच नव्हे तर या पोलिसांना स्वत: राज ठाकरे फोनही करणार आहेत. हा कार्यक्रम लवकरच होईल. कारण मृत अक्षय शिंदे याने इतक्या जवळून पोलिसांवर गोळ्या झाडल्यानंतरही पोलिसांना विशेष जखम झालेली नाही. शिवाय अक्षय शिंदेची न्यायालयात साक्ष होण्यापूर्वीच त्याला ठार केल्याने जर वेगळे काही सत्य असेल तर ते कधीच उघड होणार नाही. घटना घडल्यापासून पोलीस ज्यांना शोधू शकले नाहीत, ज्यांना अटक करू शकले नाहीत, ज्यांचा जबाब घेऊ शकले नाहीत त्या शाळा व्यवस्थापकांनाही मनसेने कोणतीही सखोल माहिती मिळण्यापूर्वीच निर्दोष ठरविले आहे. अक्षय शिंदेला दोषी ठरवून शाळा व्यवस्थापकांना मनसेने पाठिंबाच दिला आहे. त्यामुळे पोलीस इतके दिवस त्यांचा उगाच शोध घेत आहेत असाच निष्कर्ष निघेल. अक्षय शिंदे ठार होताच शाळा व्यवस्थापकांनी अटकपूर्व जामिनाचा अर्ज केला, यातही संशयास्पद काहीच नसावे.
सलमान खानवर बेकरी अपघातात आरोप झाला. त्यानंतर असा घटनाक्रम झाला की, गरिबांना चिरडणारी गाडी कोणी चालवली त्याचा आजवर शोध लागलेला नाही. चिंकारा प्राण्यांची शिकार करण्याच्या खटल्यातही दोषी सापडले नाहीत. बहुदा चिंकारा हृदयविकाराच्या झटक्याने मेले असावे. आरोपातून अशा तर्हेने मुक्त झालेल्या सलमानला आमंत्रित करण्यासाठी राज ठाकरे त्याच्या घरी स्वत: गेले, हे ‘येक नंबर’ काम आज झाले. त्याच दिवशी शर्मिला ठाकरे यांनी पोलिसांच्या संशयित भूमिकेबद्दल आरोप होत असताना त्यांना बक्षीस जाहीर केले. अक्षय शिंदे दोषी असेल तर त्याच्याबद्दल काडीमात्र सहानुभूती असण्याचे कारण नाही. पण त्याने साक्ष दिली, तर खरा गुन्हेगार अडकेल म्हणून त्याला ठार केले असेल तर त्यासारखे दुसरे पाप नाही. यासाठी ‘संशयाच्या पलिकडचा पुरावा’ आपला कायदा मागतो. बदलापूर प्रकरणात सुरुवातीपासून पोलिसांची भूमिका ही सातत्याने संशयास्पद वाटत असताना मनसेने त्यांनाच बक्षीस देऊन शाळा व्यवस्थापकांना पाठीशी का घातले? असा सवाल विचारला जात आहे.
पोलिसांची पत्रकार परिषद
पाच मिनिटांत गुंडाळली
अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी ठाणे पोलिसांच्या वतीने आज पत्रकार परिषद घेण्यात आली. ही पत्रकार परिषद अवघ्या पाच मिनिटांत उरकली. पोलिसांनी पत्रकारांच्या कुठल्याच प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत. या एन्काउंटरचा घटनाक्रमही नीट सांगितला नाही. ठाणे पोलीस आयुक्तालयात कुठल्याही वरिष्ठ अधिकार्यांऐवजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात साळवी यांनी सांगितले की, बदलापुरातील बाललैंगिक अत्याचारातील अटक आरोपी अक्षय शिंदे याच्याविरुद्ध बदलापूर पोलीस स्टेशनमध्ये आणखी एक गुन्हा दाखल झाला होता. अक्षय शिंदेच्या पूर्वीच्या पत्नीने त्याच्या विरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी एक विशेष तपास पथक तयार करण्यात आले होते. या तपास पथकातील अधिकारी काल न्यायालयाचे ट्रान्सफर वॉरंट घेऊन कायदेशीररित्या आरोपीचा ताबा घेण्यासाठी तळोजा मध्यवर्ती कारागृहात गेले होते. तिथून त्याला घेऊन येत असताना आरोपीने मुंब्रा बायपास मुंब्रादेवीच्या पायथ्याशी पोलिसांचे पिस्तुल हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत असताना जी घटना घडली, त्याबद्दल मुंब्रा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवीन कायदा संहितेनुसार 262, 132, 109, 121 या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीच्या मृत्यूनंतर अकस्मात मृत्यू प्रकरण दाखल करण्यात आले आहे. या दोन्हीही प्रकरणाचा तपास ठाणे पोलीस आयुक्त करत आहेत.
यानंतर पत्रकारांनी साळवी यांना अनेक प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. परंतु साळवी यांनी हे प्रकरण तपासाधीन आहे. त्यामुळे अधिक तपशील देता येणार नाही, एवढेच उत्तर देऊन पत्रकार परिषद गुंडाळली.
वादग्रस्त संजय शिंदेंनी
अक्षयचे एन्काउंटर केले
अक्षय शिंदेचे एन्काउंटर हे पोलीस अधिकारी संजय शिंदे यांनी केल्याचे आज उघड झाले. संजय शिंदेंची वादग्रस्त पोलीस अधिकारी अशी ओळख आहे. 2012 मधील मुंबईतील अरुण टिक्कू खून प्रकरणाचे ते तपास अधिकारी होते. या खुनाचा आरोपी विजय पालांडे पोलिसांच्या ताब्यातून फरार झाल्यानंतर त्यांना मुंबई पोलिसांतून निलंबित करण्यात आले होते. पालांडेला पळून जाण्यास त्यांनी मदत केल्याचा आरोप संजय शिंदे यांच्यावर झाला होता. संजय शिंदे यांनी माजी आयपीएस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या टीममध्ये काम केले आहे. 2014 मध्ये त्यांना पोलीस दलात घेण्यात आले. अक्षय शिंदेच्या एन्काउंटरनंतर ते पुन्हा एकदा संशयात सापडले आहेत.
दरम्यान, संजय शिंदे यांच्या जबाबानंतर मुंब्रा पोलिसांनी या प्रकरणाचा एफआयआर दाखल केला. शिंदे यांनी जबाबात म्हटले आहे की, अक्षय शिंदे आणि पोलीस अधिकारी हे व्हॅनमध्ये समोरासमोर बसले होते. मध्येच अक्षयने वाद घालायला सुरुवात केली. मला जाऊ द्या, म्हणत तो शिवी द्यायला लागला. त्यामुळे पोलिसांनी गाडी थांबवून त्याला समजवण्याचा प्रयत्न करत होते. त्याच वेळी अक्षयला राग आला व तो बाजूला बसलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या कमरेला असलेली पिस्तुल हिसकवण्याचा प्रयत्न करू लागला. त्यानंतर मोरे यांनी आरोपी अक्षय शिंदेला अडविण्याचा प्रयत्न केला. या झटापटीमध्ये निलेश मोरे यांचे पिस्तुल लोड झाले व त्यातील 1 राउंड हा निलेश मोरे यांच्या डाव्या मांडीमध्ये घुसल्याने ते खाली पडले. त्यावेळी आरोपी अक्षय शिंदे याने निलेश मोरे यांचे पिस्तुलचा ताबा घेऊन आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही असे रागारागाने ओरडून आम्हाला बोलू लागला. त्यानंतर आरोपी अक्षयने आमच्यावर 2 गोळ्या झाडल्या. परंतु आमच्या नशिबाने त्या गोळ्या आम्हाला लागल्या नाहीत. त्यानंतर प्रसंगावधान राखून मी व माझे सहकारी यांच्या स्वरक्षणार्थ माझ्याकडील पिस्तूलने 1 गोळी आरोपी अक्षय याच्या दिशेने झाडली. त्यात अक्षय शिंदे जखमी होऊन खाली पडला. जखमी अवस्थेत अक्षयला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
तपास सीआयडी करणार
ठाणे पोलिसांच्या फॉरेन्सिक पथकाने आज घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यांनी ज्या व्हॅनमध्ये एन्काउंटर झाले. तिची पाहणीही केली. या व्हॅनमध्ये तीन पुंगळ्या सापडल्याचे अधिकार्यांनी सांगितले. या एन्काऊंटरचा तपास आता सीआयडी म्हणजे गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवला आहे. हा तपास सीआयडीचे पोलीस अधीक्षक करणार आहेत.
अक्षय गतिमंद होता, मग
पिस्तुल कशी ओढली?
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी अक्षयच्या एन्काउंटरवरून आज पुन्हा सरकारवर हल्ला चढवला. त्या म्हणाल्या की, अक्षय शिंदे हा गतिमंद आहे असे बदलापूर पोलिसांनी आधी सांगितले होते. जर तो गतिमंद होता, तर तो एवढा हिंस्त्र, चालाख, काही सेकंदात पिस्तुल ओढून घेण्याइतका, चपळाईने वागणारा गुन्हेगार कसा झाला. अक्षय शिंदे याला संपवल्याने हे प्रकरण संपत नाही. या प्रकरणातून कोणाला तरी वाचवले जाते आहे. ही संपूर्ण घटना हे राज्य प्रायोजित दहशतवाद आहे, ही फेक एन्काउंटरची स्क्रिप्ट आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, एन्काउंटर खरे आहे की नाही हे जनतेला माहिती आहे. आंदोलन करणार्या जनतेवर दाखल केलेले गुन्हेही मागे घ्या. आरोपीच्या तोंडावर बुरखा आहे. हातात बेड्या आहेत, मग तो बंदूक काढून घेऊन गोळ्या कशा काय चालवतो? साफसफाई करणारा मुलगा गोळ्या कशा घालतो? कोणालातरी वाचवण्यासाठी हे सगळे झाले आहे. संस्थाचालक दोषी नसेल तर मग सीसीटीव्ही फुटेज का गायब केले? एका शिंदेने दुसर्या शिंदेचा एन्काउंटर केला आणि जनता तिसर्या शिंदेचा एन्काउंटर करेल.
शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट म्हणाले की, अक्षयने बंदूक घेऊन गोळीबार केला आणि त्यावेळी पोलिसांनी प्रत्युत्तर दिल्यावर त्याचा मृत्यू झाला. तरीसुद्धा याबाबतची सखोल चौकशी केली जाणार आहे. कायदा सर्वांसाठी आहे. परंतु जो आरोपी नाही, त्याला आरोपी बनवण्यासाठी कायदा नाही. त्यामुळे कायद्याचा वापर करताना या गोष्टी ध्यानात ठेवायला हव्या. आमदार आदित्य ठाकरे म्हणाले की, अक्षय शिंदेचे एन्काउंटर आहे का हे स्पष्ट करा. आमची मागणी होती की, त्याला फाशीची शिक्षा व्हावी. बदलापूरच्या शाळेचे ट्रस्टी कुठे आहेत? त्यांना वाचवण्याचा प्रयत्न भाजपा सरकार का करते का? हा एन्काउंटर शाळेचे संस्थापक तुषार आपटेला वाचवण्याचा प्रयत्न आहे का?
राज ठाकरे- सलमान
‘गॅलेक्सी’वर भेट
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान याची भेट घेतली. वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील सलमानच्या घरी ही भेट झाली. ’येक नंबर’ या आगामी मराठी चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्याचे आमंत्रण देण्यासाठी राज ठाकरे सलमानच्या घरी आले होते, असे सांगण्यात आले. उद्या संध्याकाळी वांद्रे येथील ताज लँडस एंड या पंचतारांकित हॉटेलमध्ये हा सोहळा होणार आहे. या सोहळ्याला राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. राज ठाकरेंच्या या भेटीमुळे अलिकडच्या काळात राजकारणी मंडळी सलमान खानला एवढे महत्त्व का देत आहेत, असा प्रश्न विचारला जात आहे.
कारण याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनेकदा सलमानच्या घरी गेले आहेत. आता राज ठाकरे यांनी सुमारे तासभर खर्च करून सलमान खानला नेमके कसले आमंत्रण दिले याची चर्चा होत आहे.
मृतदेहाच्या शवविच्छेदनाचे
व्हिडिओ रेकॉर्डिंग केले
अक्षयचा मृतदेह आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास जे जे रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी आणला होता. शवविच्छेदन करण्यापूर्वी अक्षयच्या शरीराचा एक्स-रे काढण्यात आला. त्यानंतर तीन डॉक्टरांच्या उपस्थितीत त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले. या शवविच्छेदनाचे व्हिडिओ रेकॉर्डिंगदेखील करण्यात आले. संध्याकाळपर्यंत हे शवविच्छेदन सुरू होते. या शवविच्छेदनाचा अहवाल थेट पोलीस आयुक्तांकडे देण्यात येणार आहे. मृतदेह मुंब्रा पोलिसांकडे देण्यात आला. दरम्यान, अक्षयच्या आई-वडिलांनी आज अशीही मागणी केली की, याप्रकरणी सखोल चौकशी व्हायला हवी. आमच्या मुलाने साधे फटाके फोडले नाहीत. तो बंदूक कशी खेचू शकतो? शाळा प्रशासनाच्या दबावातून हा प्रकार घडला आहे.
न्यायालयाच्या आदेशाशिवाय घेतलेला
प्रत्येक जीव फक्त हत्याच! प्रियांका गांधी
महाराष्ट्रातील बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचे एन्काउंटर झाल्यावर विरोधक प्रश्न उपस्थित करत असतानाच प्रियांका गांधी यांची एक एक्स पोस्ट व्हायरल झाली आहे. त्यामध्ये त्यांनी 13 हजार एन्काउंटरवर भाष्य करत म्हटले आहे की, न्यायालयाच्या आदेशाशिवाय घेतलेला प्रत्येक जीव फक्त हत्या आहे.
एक्स पोस्टमध्ये काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे की, खून, हिंसाचार, रक्तपात आणि एखाद्याचा जीव हिरावण्याचा राजकीय कायदा, बुलडोझरचा कायदा, याचा संविधान आणि न्याय यांच्याशी काहीही संबंध नाही. राजकीय वर्चस्वाच्या कृत्यांना कायदा आणि सुव्यवस्था म्हणणे म्हणजे राज्यघटनेचा अपमान आहे. कायदा व सुव्यवस्थेचा पाया समाजात शांतता प्रस्थापित करणे, गुन्हेगाराला शिक्षा करून त्याच्या सुधारणेसाठी आणि प्रत्येक नागरिकाला जीवन जगण्याची संधी देणे यावर आधारित आहे. अपवाद वगळता, न्यायालयाच्या आदेशाशिवाय घेतलेला प्रत्येक जीव फक्त हत्या आहे. बातम्यामंध्ये आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या सात वर्षांत उत्तर प्रदेशामध्ये सुमारे 13,000 चकमकी झाल्या आहेत. या चकमकींमुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती सुधारली आहे का? गुन्हे तर थांबत नाहीत. मग त्याचा उद्देश काय? हा खेळ का खेळला जात आहे? हे असंवैधानिक काम थांबवावे आणि ज्या चकमकींवर प्रश्नचिन्ह आणि संशय आहे, त्यांची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे.