जुलना – हरियाणा विधासभा निवडणुकीत भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट जुलना या मतदारसंघात काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. त्यांना आव्हान देण्यासाठी आम आदमी पार्टीने कुस्तीपटू व महिला खली अशी ओळख असलेल्या कविता देवी हिला रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे या मतदारसंघात ऑलिम्पिक दर्जाची कुस्तीपटू व डब्लूडब्लूएफ या टीव्ही कार्यकमातील कुस्तीपटू असा सामना रंगणार आहे. भाजपाने या मतदारसंघात कॅप्टन योगेश बैरागी यांना उमेदवारी दिली आहे. दोन कुस्तीगीरांच्या लढतीत लोण्याचा गोळा पटकावण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जात आहे.
कविता देवी हिचा जन्म जुलना तालुक्यातील मालवी गावातील आहे. कविता दलाल असे तिचे मूळ नाव असून ती डब्लूडब्लूएफमध्ये कुस्ती खेळणारी मधील पहिली भारतीय कुस्तीपटू आहे. हरियाणात काँग्रेस व आपमध्ये आघाडी करण्याची काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची इच्छा होती. मात्र या दोन्ही पक्षांमध्ये एकमत झाले नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांनी ९० जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. त्यातून मतविभाजनाचा मोठा फायदा भाजपाला मिळण्याची शक्यता आहे.