नवी दिल्ली- मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि सरचिटणीस सीताराम येचुरी (७२) यांचे आज दुपारी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने सोशल मीडियावर त्यांच्या निधनाची अधिकृत घोषणा केली. न्यूमोनियाने त्यांची प्रकृती बिघडल्याने गेल्या महिन्यात त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेले काही दिवस ते व्हेंटिलेटरवर होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांचा मृतदेह एम्स रुग्णालयात आणि नंतर मार्क्सवादी पक्षाच्या मुख्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांच्या इच्छेनुसार तो एम्स रुग्णालयाला दान करण्यात येईल. त्यांच्या मागे पत्नी सीमा चिष्ती आणि दोन मुले आहेत.
सीताराम येचुरी यांचा जन्म १२ ऑगस्ट १९५२ रोजी चेन्नई येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण हैदराबाद येथे झाले आणि त्यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन कॉलेजमधून अर्थशास्त्रातील पदवी प्राप्त केली. पुढे जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षण घेतले. तिथे त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. १९७० च्या दशकात येचुरी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (मार्क्सवादी) स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया या विद्यार्थी संघटनेत सामील झाले. १९८४ साली ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीचे सदस्य बनले. १९९२ साली त्यांची पक्षाच्या पॉलिटब्युरोमध्ये नियुक्ती झाली. पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘पीपल्स डेमोक्रसी’चे त्यांनी अनेक वर्ष संपादकपदही भूषविले. २०१५ साली ज्येष्ठ नेते प्रकाश करात यांच्यानंतर सीताराम येचुरी यांची मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाली होती. त्यानंतर २०१८ आणि २०२२ साली त्यांना दोन वेळा या पदावर राहण्याची संधी मिळाली. डाव्या पक्षातील निर्णय प्रक्रियेत सरचिटणीस हे सर्वोच्च पद मानले जाते.
२००५ ते २०१७ या काळात ते राज्यसभेचे खासदार होते. काँग्रेसच्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशी त्यांची जवळीक होती. २००४ मध्ये संयुक्त लोकशाही आघाडी (युपीए) सरकार बनवण्यात त्यांनी विशेष भूमिका बजावली होती. तर गेल्या वर्षी स्थापन झालेल्या विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीतले ते एक महत्त्वाचे नेते होते. लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहताना आपण एक मित्र गमावल्याचे म्हटले. भाजपाचे राजनाथ सिंह, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली.