इंफाळ- मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार भडकला असून दोन सशस्त्र गटांमध्ये गोळीबार झाला असून यात पाच जणांचा मृत्यू झाला.
मणिपूर येथील जिरीबाममध्ये काल एका झोपलेल्या व्यक्तीवर गोळ्या झाडण्यात आल्या. त्यानंतर दोन गट शस्त्रांसह समोरासमोर आले. या गोळीबारात आणखी ४ जण ठार झाले.
पोलिसांनी सांगितले की, दहशतवाद्यांनी जिल्हा मुख्यालयापासून सुमारे ५ किमी अंतरावर एका निर्जन ठिकाणी एकट्या राहणाऱ्या एका व्यक्तीच्या घरात प्रवेश केला. तो झोपेत असताना त्याच्यावर गोळ्या झाडून ठार केले. या हत्येनंतर सुमारे ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या टेकड्यांमध्ये दोन समुदायांमध्ये वाद सुरू झाला. यामध्ये ३ पहाडी अतिरेक्यांसह ४ लोकांचा मृत्यू झाला. या आठवड्याच्या सुरुवातीलाही या जिल्ह्यात जाळपोळीची घटना घडली होती. येथे काही लोकांनी बोरोबेकरा पोलीस ठाण्याच्या जाकुराधोर येथील एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचे ३ खोल्यांचे रिकामे घर जाळले होते.
१ ऑगस्ट रोजी आसाममधील कछार येथे सीआरपीएफच्या देखरेखीखाली एक बैठक घेऊन दोन समुदायांच्या प्रतिनिधींनी शांतता प्रस्थापीत करण्यासाठी आणि जाळपोळ आणि गोळीबाराच्या घटना थांबवण्यासाठी करार केला. मात्र,असे असतानाही जिल्ह्यात पुन्हा हिंसाचार सुरू असल्याचे पाहायला मिळाले.