पतंजली दंतमंजनात मांसाहारी घटक दिल्ली उच्च न्यायालयाची नोटीस

नवी दिल्ली – योगगुरु रामदेव बाबाच्या पंतजली आयुर्वेद कंपनीच्या दिव्य दंत मंजनमध्ये मांसाहारी घटक आहेत. असे असतांनाही त्याच्यावर शाकाहारीची खूण टाकण्यात आल्याच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेच्या सुनावणी दरम्यान दिल्ली उच्च न्यायालयाने रामदेव बाबांना नोटीस बजावली आहे.अॅडव्होकेट यतिन शर्मा यांनी या संदर्भातील याचिका दाखल केली आहे. याचिकेत म्हटले आहे की, बाबा रामदेव यांच्या पतंजली निर्मित दिव्य दंत मंजनच्या वेष्टनावर हे उत्पादन शाकाहारी असल्याची हिरवी खूण आहे. या वेष्टनावरील उत्पादनातील घटकांच्या यादीत मात्र सेपीया ओफिशिनालीस म्हणजेच एक प्रकारच्या माशांच्या भुकटीचा उल्लेख आहे. यामुळे रामदेव बाबा हे लोकांची दिशाभूल करत असून औषध व सौंदर्यप्रसाधने कायद्याचेही उल्लंघन आहे.या याचिकेवरील सुनावणी आज न्यायमूर्ती संजीव नरुल्ला यांच्या समोर झाली. त्यांनी या प्रकरणी केंद्र सरकार आणि पंतजली दिव्य फार्मसीच्या विरोधात नोटीस बजावली असून त्यांना आपले म्हणणे मांडायला सांगितले आहे. बाबा रामदेव यांच्यावरील विश्वासाने लोकांनी त्यांच्या उत्पादनांची मोठ्या प्रमाणात खरेदी सुरु केली होती. गेल्या काही दिवसांमध्ये त्यांच्या एका उत्पादनातील फोलपणा दिसून येत आहे. या प्रकरणावरील पुढील सुनावणी २८ नोव्हेंबर रोजी होणार आहे.