पुणे- पुरंदर तालुक्यातील जेजुरी गडावर २ सप्टेंबर रोजी श्री खंडोबा देवाची सोमवती यात्रा भरणार आहे. या यात्रेनिमित्त होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता त्यांच्या वाहनांची होणारी वाहतुक कोंडी टाळण्यासाठी जेजुरीकडे जाणार्या सर्व मार्गामध्ये बदल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत.
या सोमवती यात्रेच्या पार्श्वभूमीवर २ सप्टेंबर रोजी पहाटे ५ वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत पुणे-जेजुरी- बारामती महामार्गावर जड वाहने आणि इतर वाहतुकीस बंदी घालून अन्य पर्यायी मार्ग वापरण्याचा निर्णय घेतला आहे.तसेच जेजुरी पोलीस ठाणे हद्दीत सातारा, फलटण, लोणंद, बारामती येथून पुण्याकडे जाणारी जड वाहतूक पूर्णपणे बंद असेल. तसेच नीरा-मोरगाव-सुपा ते केडगाव चौफुला मार्गे सोलापूर महामार्गान पुण्याकडे वळवली जाईल. तसेच जेजुरी बेलसर फाटा मार्गावर पुण्याकडून बारामतीकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहील. याकाळात बेलसर-कोथळे- नाझरे-सुपे- मोरगाव मार्गे बारामती,फलटण आणि साताराकडे वाहने वळवली जातील.
त्याचप्रमाणे सुपा पोलीस ठाणे हद्दीत बारामती आणि नीरा बाजूकडून जेजुरी मार्गे पुण्याकडे जाणारी वाहतूक मोरगाव-सुपा- केडगाव चौफुला मार्गे सोलापूर महामार्गाने वळवली जाईल. सासवड पोलीस ठाणे हद्दीत पुण्याकडून जेजुरी मार्गे फलटण-सातारा बाजूकडे जाणारी जड वाहतूक पूर्णपणे बंद असेल आणि सासवड-नारायणपूर- कापुरहोळ मार्गे सातारा-फलटण किंवा सासवड-वीरफाटा-परिंचे-वीर-वाठार कॉलनी मार्गे लोणंद अशी वाहतूक वळवली जाईल.