नवी दिल्ली – मंकीपॉक्सचे निदान करण्यासाठी भारतात विकसित करण्यात आलेल्या किटला सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनकडून मंजुरी मिळाली आहे. सिमेन्स हेल्थकेअर या कंपनीकडून किटचे उत्पादन केले जाणार आहे.
जगभरात कोरोना विषाणूचा प्रसार झाला होता त्यावेळी जागतिक आरोग्य संघटनेने सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली होती. त्यानंतर आता मंकीपॉक्समुळे आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे. या विषाणूचा नवीन उपप्रकार अधिक संक्रमणक्षम मानला जातो. या उपप्रकाराचा मृत्यू दर जास्त आहे. या पार्श्वभूमीवर भारताने मंकीपॉक्सचे निदान करण्यासाठी स्वदेशी चाचणी किट विकसित केले आहे. या किटला केंद्रीय औषध नियमन संस्थेने मान्यता दिली आहे.
सिमेन्स हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून बडोदा येथे या किटची निर्मिती केली जाणार आहे, ज्याची उत्पादन क्षमता वर्षाला एक दशलक्ष इतकी आहे. आयएमडीएक्स मंकीपॉक्स डिटेक्शन आरटी-पीसीआर ही एक महत्त्वाची निदान चाचणी आहे. यामुळे विविध उपप्रकारांची काटेकोर तपासणी करता येणे शक्य होणार आहे.