फलटण- शहरातील श्रीराम सहकारी कारखान्याच्या बाजूला असलेल्या वीर धरणाच्या उजव्या कालव्याला भेगा पडल्याची घटना घडल्याने हा कालवा फुटण्याची भीती निर्माण झाली होती.मात्र पाटबंधारे खात्याच्या सतर्कतेमुळे विविध उपाययोजना करून हा धोका टाळल्याचे सांगितले जात आहे.
१५ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास फलटण शहरातील श्रीराम कारखान्याच्या बाजूला असलेल्या फुले बिल्डिंगच्या मागे नीरा उजव्या कालव्याच्या भरावास मोठमोठ्या भेगा पडल्याचे निदर्शनास आले.त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.मात्र याबाबतची माहिती कळताच नीरा उजवा कालवा कार्यकारी अभियंता शिवाजी सावंत यांनी तातडीने तहसीलदार आणि पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून आवश्यक उपाययोजना राबविण्याच्या सूचना दिल्या.त्यानुसार वीर धरणातून कालव्यात होणारा विसर्ग कमी करण्यात आला. तसेच कालव्यातील अतिवाहक उघडून पाणी ओढा आणि नाल्यात सोडण्यात आले.त्यानंतर मुरुम टाकून भेगा बुजवून रस्ता तयार करण्यात आला. तसेच बाहेरच्या बाजूने भरावाचे काम सुरू केले.हे काम आणखी चार दिवस चालणार असल्याने याठिकाणी नागरिकांनी गर्दी करू नये असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.