मुंबई- पावसाचा जोर ओसरून उघडीप मिळू लागल्याने आता पालिका प्रशासन मुंबईच्या रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम हाती घेणार आहे. पालिका गुरुवार १५ ऑगस्टपासून युद्धपातळीवर खड्डेमुक्ती मोहीम राबविणार आहे, अशी माहिती पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.
आयुक्त अभिजीत बांगर म्हणाले की,पावसाने उसंत घेतल्याने आणि गणेशोत्सव तोंडावर आल्याचे लक्षात घेता रस्त्यावरील खड्डे भरण्याच्या कामाला व्यापक स्वरुप दिले जाणार आहे. कारण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या समन्वय समितीकडून गणेशमूर्ती आगमन आणि विसर्जन मिरवणुकीसाठी रस्ते सुस्थितीत ठेवण्याची मागणी केली जात असते. झाडांच्या रस्त्यावर लोंबकळणाऱ्या फांद्याही तोडण्यास सांगितले जाते. त्यामुळे पालिकेने यंदाही ही मागणी लक्षात घेऊन आधीच रस्तेदुरुस्ती मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.त्यासाठी अनुकूल वातावरणही असल्याने गुरुवार १५ ऑगस्टपासूनच ही खड्डेमुक्ती मोहीम सुरू होणार आहे.