महाबळेश्वर- तालुक्यातील पाचगणी गिरीस्थान शहरानजीकच्या नरवीर तानाजी मालुसरे यांच्या गोडवली गावातील शेतजमिनीला अचानकपणे मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत.त्यामुळे ग्रामस्थांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.तसेच त्यामुळे गावातील तपनेश्वर मंदिरालाही भुस्खलनाचा धोका होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
गेल्या महिनाभरापासून महाबळेश्वर तालुक्यात दमदार पाऊस कोसळत आहे.त्यामुळेच गोडवली गावातील तपनेश्वर मंदिराजवळ असलेली शेत जमिन मोठ्या प्रमाणात खचली असून मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. जमिनीला आणखी भेगा पडून ती खचत असल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. राहिलेली शेतीही
भूस्खलनात जाते की काय, अशी भीती या जमीन मालकामध्ये निर्माण झाली आहे.गोडवली हे गाव पांचगणी शहरानजीक टेबल लँडच्या कुशीत वसलेले आहे.गेल्या १० ते १२ वर्षापुर्वी याचठिकाणी जमीन खचली होती.त्यावेळी अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती.परंतु जमिन खचण्याच्या प्रकाराची भौगोलिक तज्ज्ञांकडून पाहणी करायला हवी होती. ती अद्याप केली गेली नाही.
तसेच त्यावर उपाययोजना करायला हवी होती.त्यानंतर आता मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा ही जमीन खचू लागली आहे.शेतीमध्ये सुमारे १०० फूट लांबीची व पाच ते सहा फूट उंचीची भेग पडली आहे.जमीन खचत असल्याने ऐन खरिपाच्या हंगामात वाटाणा लागवड करायची होती ती राहून गेली आहे.गोडवलीतील सतीश रघुनाथ गुरव यांची ही शेतजमीन आहे.महसूल विभागाला कळवूनही या ठिकाणी कुणीही आले नसल्याचे सतीश गुरव यांनी म्हटले आहे.या जमिनी जवळच तपनेश्वर मंदिर असल्याने भविष्यात या मंदिरालाही जमीन खचण्याचा धोका पोहचण्याची भीती व्यक्त केली जात आहे.