पॅरिस – पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्य पदके पटकावत इतिहास घडविणारी भारताची युवा नेमबाज मनू भाकरची आज पदकांची हॅट्ट्रिक हुकली. 25 मीटर एअर पिस्तुल प्रकारात तिला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. एकाच ऑलिम्पिकमध्ये तीन स्पर्धांची अंतिम फेरी गाठणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली होती.
तीन मालिकांनंतर एलिमिनेशनची फेरी सुरू झाली. एकूण 15 शॉट्स मारल्यानंतर मनुने 10.2 पेक्षा अधिक गुण घेत आपले अस्तित्व जिंवत ठेवले. प्रतिस्पर्धींवर दडपण वाढवत तिसर्या स्थानावर झेप घेतली होती. मात्र अखेर क्षणी दोन अचूक लक्ष्यभेद करण्यात तिला अपयश आल्याने तिला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरने ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. तिने प्रथम 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात आणि 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात सरबज्योत सिंग याच्यासोबत दुसर्या कांस्य पदकाला गवसणी घातली. एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके पटकवणारी ती देशातील पहिली खेळाडू ठरली आहे.