मुंबई :
राज्यात मागील वर्षाच्या तुलनेत डेंग्यू आणि चिकुनगुनियाचे रुग्ण वाढत आहेत. १ जानेवारी ते २१ जुलै या कालावधीत मागील वर्षीच्या तुलनेत यंदा राज्यात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत ५७ टक्के वाढ झाली असून चिकुनगुनियाच्या रुग्णसंख्येत तिप्पट वाढ झाली आहे.
आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, राज्यात १ जानेवारी ते २१ जुलै २०२४ या काळात डेंग्यूचे ४ हजार ९६५ रुग्ण तर चिकुनगुनियाचे १ हजार ७५ रुग्ण आढळले. त्यापैकी ८० टक्के रुग्ण हे गेल्या दोन ते अडीच महिन्यात नोंदवले गेले आहेत. या काळात राज्यात डेंग्यूचे ३ मृत्यू झाले. चिकनगुनियाचा एकही मृत्यू नाही. २०२३ मध्ये याच कालावधीत राज्यात डेंग्यूचे ३ हजार १६४ तर चिकनगुनियाचे ३६३ रुग्ण होते. राज्यात २०२३ मध्ये उपचारादरम्यान डेंग्यूच्या ४ रुग्णांचा मृत्यू झाला. चिकनगुनियाने एकही मृत्यू झालेला नाही. दरम्यान, राज्यात १ जानेवारी ते २१ जुलै २०२३ दरम्यानच्या काळात झिकाचा १ रुग्ण आढळला होता. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२३ दरम्यानच्या काळात १८ रुग्ण नोंदवले गेले होते. परंतु, १ जानेवारी ते २१ जुलै २०२४ दरम्यानच्या राज्यात झिकाचे ३९ रुग्ण आढळले आहेत.