मुंबई- मुंबई शहरातील कचरा सध्या देवनार आणि कांजूरमार्ग येथील डम्पिंग ग्राउंडवर टाकला जातो. देवनारची क्षमता संपल्याने आता नवी मुंबईतल्या तळोजा येथील ५२ हेक्टर जागेवर मुंबई महापालिका अत्याधुनिक डम्पिंग ग्राउंड उभारणार असून यासाठी महापालिकेने ३० हेक्टर जागा ताब्यात घेतली आहे. उर्वरित २२ हेक्टर जागेचा ताबा,परवानग्या मिळाल्यानंतर इतर प्रक्रिया पूर्ण करून तळोजा डम्पिंग ग्राउंडचे काम पूर्ण करण्यात येईल.
देवनार डम्पिंग ग्राउंडवरील ६०० टन कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून वीजनिर्मिती करण्यात येणार आहे. त्यासाठी पालिकेने ९० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.मुलुंड येथील डम्पिंग ग्राऊंड बंद करण्यात आले आहे; मात्र कांजूरमार्ग व क्षमता संपलेले देवनार डम्पिंग ग्राउंड सुरू आहेत. ही दोन्ही डम्पिंग ग्राउंड बंद करून तळोजा येथे ५२ हेक्टर जमिनीवर डम्पिंग ग्राउंड सुरू करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.देवनार डम्पिंगवरील कचऱ्यावर प्रक्रिया करून खत आणि वीजनिर्मिती करावी आणि मुंबईला डम्पिंगमुक्त करावे, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईबाहेर डम्पिंग ग्राउंडचा शोध सुरू असून तळोजा येथील जागेवर डंपिंग ग्राऊंड सुरू करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, अंबरनाथ तालुक्यातील करवले गावातील जागेवर मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज वास्तव्यास आहे. त्यांनी डम्पिंग ग्राउंडला विरोध केल्याने येथे डम्पिंग ग्राउंड उभे करण्याबाबतचा निर्णय मागे पडला आहे.