भिवंडी – भिवंडी शहरातील विविध ठिकाणी ६ ते ८ जुलै दरम्यान भटक्या कुत्र्यांनी तब्बल १३५ नागरिकांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत.फक्त शांतीनगरातच पिसाळलेल्या कुत्र्यांनी ४० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना व नागरिकांना चावा घेतला होत. याची गंभीर दखल घेत महापालिका प्रशासनाने आता कुत्र्यांच्या
निर्बिजीकरणासाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.लवकरच श्वानांच्या निर्बीजीकरणाची निविदा प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी दिली.
भिवंडी महापालिकेने मागील १२ वर्षांपासून भटक्या कुत्र्यांना पकडून पकडून त्यांची नसबंदी करण्याची प्रक्रिया पूर्णपणे बंद केली आहे. त्यामुळे भिवंडीत भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. शहरातील रस्ते आणि गल्ल्या भटक्या श्वानांचे आखाडे बनले आहेत. रस्त्यांवरून जाणारे नागरिक अथवा वाहनांचा पाठलाग करून त्यांना चावण्याचे प्रकार दैनंदिन घडत आहेत. एका महिन्यात सुमारे ८८६ जणांना भटके कुत्रे चावल्याची नोंद झाली आहे. पालिकेच्या सर्वेक्षणानुसार २०१८ मध्ये त्यांची संख्या ८,५१९ होती.दरम्यानच्या काळात श्वानांची संख्या लक्षणीय वाढली असून सध्या शहरात सुमारे २५ हजारपेक्षा जास्त भटके श्वान आहेत.त्यांची संख्या मोजून आणि त्यांना मार्किंग करून नव्याने त्यांची नसबंदीची मागणी नागरिकांनी केली आहे.
दरम्यान,आरोग्य विभागाकडे ४८५ रेबीज इंजेक्शन उपलब्ध आहेत. त्यापैकी १५ रेबीज लसीचा वापर आरोग्य केंद्रात (ईदगाह केंद्र) करण्यात आला आहे. उर्वरित इंजेक्शन महापालिकेच्या दवाखान्यात उपलब्ध आहेत.श्वान चावल्यानंतर नागरिकांनी महापालिकेच्या या दवाखान्यात जाऊन रेबीजचे इंजेक्शन घ्यावे. तसेच, शहरातील भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी लागणारी कायदेशीर प्रक्रिया कागदोपत्री पूर्ण केली असून लवकरच त्यासाठी निविदा प्रसिद्ध करणार असल्याचे पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी सांगितले.