राज्यात पावसाची विश्रांती कोल्हापुरात पूरस्थिती कायम

मुंबई- राज्यातील अनेक भागात आज पावसाने विश्रांती घेतली. पुण्यातील कालच्या पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी भरले होते. काही भागातील पाणी ओसरले असले तरी वीज व पाणीपुरवठा बंद असल्यामुळे लोकांचे हाल झाले. कोल्हापुरात पाऊस सुरूच राहिला. त्याचबरोबर राधानगरी धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ झाली.
पुण्यात आज सकाळी खडकवासला धरणातून १३ हजार ४१६ क्सुसेकने विसर्ग सुरु राहिल्याने पुणेकरांच्या हालात भर पडली. पुण्यातील एकतानगर, सिंहगड रोड, संगम परिसर, शिवाजी नगर, हॅरीस ब्रिज, शांतीनगर झोपडपट्टी, दांडेकर पूल, दत्तवाडी, विश्रांतवाडी मधील अनेक परिसरातील पाणी आज ओसरल्याने लोक आपापल्या घरी परतले असले तरी घरांमध्ये चिखल जमा झाला असून संसारोपयोगी वस्तू खराब झाल्या असून अनेक ठिकाणी पाणीपुरवठाही बंद करण्यात आल्यानेही लोकांचे हाल झाले. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात येणार असल्याच्या प्रशासनाच्या आश्वासनामुळे पुणेकरांचे हाल कमी होण्याची शक्यता आहे. सातारा, सांगली जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी कोयना, चांदोली आदी अनेक धरणांमधून विसर्ग वाढवण्यात आल्याने वारणा, कृष्णा या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला तर काही नागरिकांचे आजही स्थलांतर करण्यात आले. त्यात कृष्णा नदीच्या पात्रांमधून नदीकाठी महाकाय मगरींचे दर्शन झाल्यामुळे नागरिकांनी सावध राहण्याच्या सूचना देण्यात आला आहे. कोल्हापूरातील पावसामुळे आजही अनेक भागात पाणी साचले. राधानगरी धरणाचे सहा दरवाजे उघडल्याने भोगवती नदीपात्रात पाणी आले आहे. पंचगंगा नदीची पातळीही वाढली.
कोकणातही पावसाने आज विश्रांती घेतली. खेडमधील जगबुडी नदीची पाणी पातळी ओसरली. संगमेश्वरातील बावनदी तसेच राजापूर येथील कोदवली नदीच्या पातळीत वाढ झाली. संगमेश्वरातील शास्त्री नदी धोक्याच्या पातळीवरुन वाहत आहे. विदर्भातही पावसाचा जोर ओसरला. मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस सुरु असल्याने आंबेजोगाई जवळच्या काळवटी तलाव ओसंडून आहे. मांजरा धरणामध्येही पाणीसाठा वाढला असून धरण मृतसाठ्याच्या बाहेर आले आहे.

सांगलीतील ८० कैद्यांना
कोल्हापूरला हलवले

सांगली जिल्हा कारागृहातून आतापर्यंत ८० कैद्यांना कोल्हापूरमधील कळंबा जेलमध्ये हलवण्यात आले आहे. सांगली जिल्हा कारागृहाने संभाव्य पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे.
कोल्हापूरला पाठवण्यात आलेल्या कैद्यांमध्ये २० महिला आणि ६० पुरुष कैदी यांचा समावेश आहे. यामध्ये काही मोस्ट वॉन्टेड कैदी आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top