चीनमध्ये निवृत्तीचे वय ७० वर्ष करणार

बीजिंग- चीनचा जन्‍मदर घसरत चालला असून वृद्धांची संख्‍या मात्र वाढत आहे.त्‍यामुळे देशात काम करणार्‍यांची संख्‍या कमी होत आहे. ही परिस्‍थिती लक्षात घेऊन चीन सरकारने निवृत्तीचे वय १० वर्षांनी वाढवून ७० वर्ष केले जाणार आहे .

चीनमध्‍ये पुरुष ६० व्‍या वर्षी आणि महिला ५५ व्‍या वर्षी निवृत्त होतात.कठोर परिश्रमात गुंतलेल्‍या महिलांना ५० वर्षांनंतरच सेवानिवृत्ती मिळते. चीनमधील सरासरी आयुर्मान (अधिक काळ जगणे) आता अमेरिकेपेक्षा अधिक आहे.जागतिक बँकेच्‍या अहवालानुसार चीनमधील सरासरी आयुर्मान ७८ वर्षांपर्यंत पोचले आहे.अमेरिकेत सरासरी आयुर्मान ७६ वर्षे आहे.चीनमध्‍ये निवृत्तीवेतन घेणार्‍यांची संख्‍या ३० कोटींच्‍या पुढे गेली आहे. यामुळे सरकारला अधिक निवृत्तीवेतन द्यावे लागते.हा पैसा जनतेला वेतनाच्‍या स्‍वरूपात द्यावा आणि त्‍या बदल्‍यात त्‍यांच्‍याकडून काम करून घेता येईल, असा सरकारचा विचार आहे. जगभरात अनेक देशांमध्‍ये काम करणार्‍या लोकांची संख्‍या अल्‍प झाल्‍यामुळे निवृत्तीचे वय वाढवण्‍याचा विचार चालू आहे. डेन्‍मार्क, ग्रीस, इटली, आईसलँड, इस्रायल यांसारख्‍या देशांमध्‍ये कमाल ७७ वर्षे निवृत्तीची तरतूद आहे. अमेरिकेत हे वय ६६ वर्षे आहे. श्रीलंकेत निवृत्तीचे वय ५५ वर्षे होते, ते आता ६० वर्षे करण्‍यात आले आहे. फ्रान्‍समध्‍ये निवृत्तीचे वय ६२ वरून ६४ करण्‍यात आले आहे. ब्रिटनमध्‍ये निवृत्तीचे वय ६६ वर्षे आहे.

भारतात सेवानिवृत्तीचे वय एकसमान नाही. केंद्र सरकारी नोकर्‍यांमध्‍ये निवृत्तीचे वय ६० वर्षे आहे, तर राज्‍य सरकारांमध्‍ये ते ५८ ते ६० वर्षे आहे. अनेक राज्‍यांमध्‍ये निवृत्तीचे वय वाढवण्‍याची मागणीही सरकारकडे करण्‍यात आली आहे.