मुंबई – गेल्या 24 तासांत राज्यातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाचे थैमान पाहायला मिळाले. सलग दोन दिवस पडणार्या पावसामुळे राज्यातील अनेक नद्यांना पूर आला. रस्ते आणि गावे पाण्याखाली गेली. मुंबईत पडलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचल्याने रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला. नागपूरमध्ये पावसाने जनजीवन पार विस्कळीत केले. मुंबईतील ग्रँट रोड येथील एका इमारतीचा भाग कोसळल्याने एका महिलेचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले. पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, घाट क्षेत्र आणि विदर्भातील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबईत शनिवारी रात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. मुंबई शहरापेक्षा उपनगरात पावसाचा जोर अधिक होता. गेल्या 24 तासांत मुंबई शहरात 91, पूर्व उपनगरात 87 तर पश्चिम उपनगरात 93 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सकाळी साडेअकराच्या सुमारास समुद्राला मोठी भरती असल्याने समुद्रात मोठ्या लाटा उसळल्या होत्या. पावसाचे पाणी साचल्याने अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. किंग्ज सर्कल, चेंबूर, अंधेरी आदी सखल भागांत पाणी साचल्याने रस्ते वाहतूक मंदावली होती. पावसामुळे रेल्वेसेवेवरही परिणाम झाला. मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेच्या गाड्या 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत होत्या. धरणक्षेत्रात चांगला पाऊस पडत असल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणारा तुळशी तलाव आज सकाळी भरून वाहू लागला. यंदाच्या पावसाळ्यात भरून वाहणार्या सातपैकी तुळशी हा पहिलाच तलाव ठरला. ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली, पालघर, बोईसर, शहापूर, वसई-विरार, भिवंडी आदी भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे सखल भागांतील रस्ते पाण्याखाली गेले. अनेकांच्या घरात पावसाचे पाणी शिरले.नवी मुंबईत एपीएमसी मार्केटमध्ये गुडघाभर पाणी साचले होते. अनेक ठिकाणी रस्ते पुरते जलमय झाल्याने नालेसफाईची
पोलखोल झाली. मुसळधार कोसळणार्या पावसाने कोकणलाही झोडले. रत्नागिरीमधील खेड तालुक्यात हाहा:कार उडवला असून, जगबुडी आणि नारंगी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. तालुक्यात गेल्या 24 तासांत 107.85 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जगबुडी नदी 7.25 मीटर पातळीवरून वाहत असून, पावसाचा जोर कायम आहे. नारिंगी, जगबुडी नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहू लागल्याचे समजताच अनेक शाळांनी सुट्टी जाहीर केली. खेड – दापोली मार्गावर पाणी आल्याने मार्ग सुमारे 12 तास वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला.
सिंधुदुर्गात गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा पावसाचा जोर वाढला. कुडाळ तालुक्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने नदीकिनारी भागात पूरस्थिती निर्माण झाली. भंगसाळ कर्ली, वेताळ बांबर्डे – हातेरी व हुमरमळा-पीठढवळ या प्रमुख तीनही नद्यांना महापूर आल्याने नदीकिनारा परिसर जलमय झाला.नदीकाठावरील कुडाळ शहर, पावशी, वेताळ बांबर्डे, पणदूर, हुमरमळा, बांव, बांबुळी, मुळदे, आंबडपाल यांसह अन्य भागांत मिळून सुमारे 70 ते 80 घरांना पहाटे पुराच्या पाण्याने वेढा घातला. त्यामुळे साखरझोपेत नागरिकांची तारांबळ उडाली. सिंधुदुर्ग कुडाळ रस्ता वाहून गेला. वैभववाडी करूळघाटात दरड कोसळल्याने वाहतुकीवर परिणाम झाला.
रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने जिल्ह्यातील नदी-नाले भरून वाहू लागले आहेत. जिल्ह्यातील सावित्री, अंबा, कुंडलिका, पाताळगंगा, उल्हास, गाढीनदी भरून वाहत आहेत.कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली. दुपारी रोहा अष्टमी पुलावर पाणी आल्याने जुना पूल वाहतुकीस बंद ठेवण्यात आला. वाहतूक नव्या पुलावरून वळवण्यात आली. रायगड जिल्ह्यातील 28 धरणांपैकी 21 धरणे 100 टक्के भरली आहेत. यातील 20 धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. उर्वरित धरणांपैकी 4 धरणे 100 टक्के भरण्याच्या मार्गावर आहेत.
विदर्भात गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. परंतु गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने अनेक सखल भागांत पाणी साचले. अनेक भागांत वीजपुरवठाही खंडीत झाला होता. नागपूरमधील श्रीहरी नगरमधील रहिवाश्यांच्या घरात तसेच दुकानात पाणी शिरल्याने चांगलीच तारांबळ उडाली. विदर्भातील अनेक शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली.नागपूरमधील पिपवा गावात नदीला पूर आल्याने मानेवाडा चौक परिसरात घरात पाणी शिरले. नागपूर शहरात विमानतळाकडे जाणार्या रस्त्यावरही पाणी साचले होते. गोंदिया येथील वाघ नदीवरील पूल पाण्याखाली गेला. चंद्रपूर जिल्ह्यात देखील गुरुवारी रात्रीच्या सुमारास ढगफुटीसदृश पाऊस झाला. नागबीड तालुक्यात दोन जण पुरात वाहून गेले. वर्धा जिल्ह्यातदेखील पेंढरी आणि आजूबाजूच्या परिसरात मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. अमरावतीमध्ये नदीला पूर आल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरले. कोल्हापूरमधील पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीजवळ पोहोचली असून 75 बंधारे पाण्याखाली गेले. हवामान खात्याने पुढील काही दिवस महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा दिला असून, वेगवेगळ्या जिल्ह्यांना ऑरेंज आणि रेड अॅलर्ट दिले आहेत.
