नवी दिल्ली – मायक्रोसॉफ्टच्या क्राऊडस्ट्राईक अपडेटमुळे काल जगभरातील संगणक प्रणाली प्रभावित झाली. त्याचा फटका जगभरच्या वेगवेगळ्या सेवांना बसला. आज दुसऱ्या दिवशी काही सेवा पुन्हा सुरू झाल्या असल्या तरी आजही विमान उड्डाण संचालनात अडचणी येत होत्या. हा बिघाड सुरू झाल्यापासुन जगभरातील ६,८५५ उड्डाणे रद्द झाली आहेत. हे प्रमाण ६.२ टक्के इतके आहे. विमानसेवा सुरळीत नसल्याने जगभरातील विमानतळांवर आजही प्रवाशांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. तज्ज्ञांच्या मते, हा बिघाड दुरुस्त करण्याचे काम सुरू असले तरी तो पूर्णपणे दुरूस्त होण्यास आठवडाभराचा कालावधीही लागू शकतो.
कालच्या बिघाडामुळे उरणच्या जेएपीटी बंदरालाही मोठा फटका बसला. जेएनपीटी बंदरामध्ये जवळपास ७,५०० कंटेनरच्या रांगा लागल्या होत्या. मायक्रोसॉफ्टचा सर्व्हर डाऊन झाल्यामुळे कंटेनरची नोंदणी रखडली आणि त्यामुळं अर्ध्या तासाऐवजी कंटेनर प्रवेशद्वारातून आतमध्ये येण्याच्या प्रक्रियेसाठी १३ ते १४ तास प्रतीक्षा करावी लागली. या कंटेनरमधून फळे परदेशी पाठवली जातात. ही परिस्थिती बदलण्यासाठी दोन दिवसांचा अवधी लागणार असून यामुळे तीन कोटी रुपयांच नुकसान होणार असल्याचे सांगितले जात आहे.