हैदराबाद – ईटिव्ही नेटवर्क, ईनाडू वृत्तपत्र आणि रामोजी फिल्मसिटीचे संस्थापक, माध्यम सम्राट रामोजी राव यांचे आज पहाटे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले.त्यांना उच्च रक्तदाब आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने ५ जून रोजी हैदराबादमधील स्टार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे उपचार सुरू असताना आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
रामोजी राव यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. १६ नोव्हेंबर १९३६ रोजी आंध्र प्रदेशच्या कृष्णा जिल्ह्यातील पेडापरुपुडी गावात एका शेतकरी कुटुंबात रामोजी राव यांचा जन्म झाला.रामोजी राव यांनी जगातील सर्वात मोठे थीम पार्क आणि फिल्म स्टुडिओची स्थापना केली.
ईनाडू वृत्तपत्र, ईटीव्ही नेटवर्क, रमादेवी पब्लिक स्कूल, प्रिया फूडस, कालांजली, उषाकिरण मुव्हीज, मयुरी फिल्म डिस्ट्रिब्युटर्स आणि डॉल्फीन ग्रुप ऑफ हॉटेल्स या रामोजी राव यांनी स्थापन केलेल्या कंपन्या आहेत. त्यांच्या निधनावर सर्व स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. रामोजी राव यांच्या निधनावर नरेंद्र मोदी यांनी दुखः व्यक्त केले. मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला रामोजी राव यांच्याशी चर्चा करण्याची संधी मिळाली.त्यांच्या निधनाचे वृत्त क्लेशदायक आहे. त्यांच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो, अशा आशयाची पोस्ट मोदींनी केली.