लंडन – ब्रिटनमध्ये सार्वत्रिक निवडणुका ४ जुलै रोजी होतील अशी घोषणा पंतप्रधान ऋषि सुनक यांनी केली. काल पंतप्रधान सुनक यांनी कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर डाऊनिंग स्ट्रीट येथील आपल्या शासकीय निवासस्थानाच्या गॅलरीतून सुनक यांनी निवडणुकीची घोषणा केली.
बीबीसी, आयटीव्ही, स्काय न्यूज आणि गार्डियन यांसारख्या मातब्बर वृत्त वाहिन्या आणि वृत्तपत्रांनी पंतप्रधान सुनक बुधवारच्या कॅबिनेट बैठकीनंतर निवडणुकीची घोषणा करतील,अशी शक्यता आधीच वर्तविली होती.
परराष्ट्र मंत्री डेव्हीड कॅमेरॉन हे अचानक आपला अल्बानिया दौरा अर्धवट सोडून कॅबिनेट बैठकीसाठी ब्रिटनमध्ये दाखल झाले. तर संरक्षण मंत्री ग्रँट शाप्स यांनी आपला पूर्व युरोपचा बुधवारच्या कॅबिनेट बैठकीसाठी पुढे ढकलला होता. तेव्हाच माध्यमांना निवडणुकांची चाहूल लागली होती.
ब्रिटनच्या राज्य घटनेनुसार सार्वत्रिक निवडणुका जानेवारी २०२५ पर्यंत घेणे आवश्यक होते. पण सुनक त्याआधीच निवडणुका घेण्यास आग्रही होते. अनेकदा त्यांनी तसे बोलूनही दाखविले होते. त्यानुसार त्यांनी आता ही निवडणूक जुलैमध्येच घेण्याचे जाहीर केले आहे.