व्हॅटिकल सिटी
ख्रिस्ती धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी इटलीच्या नागरिकांना जन्मदर वाढवण्याचे आवाहन केले आहे. आपल्या संदेशात त्यांनी म्हटले आहे की, सध्या इटलीमधील घरे सामानांनी भरलेली आहेत. तिथे अनेक कुत्रे व मांजरी आहेत. मात्र या घरांमध्ये लहान मुलांची किलबिल ऐकू येत नाही.
गेल्या पंधरा वर्षांमध्ये इटलीच्या जन्मदरात सातत्याने घट होत आहे. गेल्या वर्षी तो निचांकी ३ लाख ७९ हजार वार्षिक एवढा झाला होता. त्यामुळे पोप यांनी इटलीच्या नागरिकांना अधिकाधिक मुलांना जन्माला घालण्याचे आवाहन केले आहे. काल व्हॅटिकन सिटीमध्ये दिलेल्या संदेशात पोप यांनी जगातील लोकसंख्येच्या प्रमाणातील असमतोलाची चर्चा केली. सध्या लोकांना संपवण्याच्या शस्त्रांच्या व्यापारात मोठी गुंतवणूक होत आहे. इतर प्रकारे जीवनाला संरक्षण देणारी यंत्रणा आहे. हे कोणत्या प्रकारचे जीवन आपण जगत आहोत. हे फार वाईट आहे, असेही त्यांनी विश्वाला दिलेल्या आपल्या संदेशात म्हटले आहे. ८७ वर्षीय पोप फ्रान्सिस हे अनेक वर्षांपासून शस्त्रनिर्मिती उद्योगाला विरोध करत आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी कृत्रिम गर्भनिरोधक न वापरण्याच्या भूमिकेचेही समर्थन केले आहे. गर्भनिरोधासाठी नैसर्गिक मार्ग वापरण्याला त्यांनी समर्थन दिले आहे.