मुंबई –
रेमंड समूहाचे अध्यक्ष गौतम सिंघानिया आणि समूहाचे संस्थापक आणि गौतमचे वडील विजयपत सिंघानिया यांच्यामध्ये सुरू असलेला वाद गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत होता. मात्र आता हा वाद मिटला आहे. याबाबत गौतम सिंघानिया यांनी सोशल मिडीयावर त्यांचा आणि विजयपत सिंघानिया यांचा फोटो पोस्ट करत माहिती दिली आहे. तब्बल ८ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर सिंघानिया पिता-पुत्रामधील वाद मिटला आहे.
२०१५ मध्ये विजयपत यांनी काही वर्षांपूर्वी रेमंड कंपनीचे नेतृत्व आणि हजारो कोटींचे शेअर गौतम यांच्या नावावर केले होते. मात्र, त्यानंतर २०१७ मध्ये या पिता-पुत्रांमध्ये वाद झाला. या वादानंतर गौतम यांनी वडील विजयपत यांना उद्योग समुहासह घरातून बाहेर काढले होते. यानंतर गौतम यांच्यावर टीका झाली होती. यानंतर विजयपत भाड्याच्या घरात राहत होते. हा वाद सर्वांसाठीच चर्चेचा विषय ठरला होता. मात्र आता सिंघानिया कुटुंबातील हा वाद मिटला आहे. विजयपत सिंघानिया पुन्हा घरी परतले आहेत. याबाबत गौतम सिंघानिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे. त्यांनी वडीलांसोबतचा एक फोटोही पोस्ट केला आहे. फोटोसोबत त्यांनी लिहीले आहे की, आज माझे वडील माझ्या घरी आले आहेत, त्यामुळे मी आनंदी आहे. त्यांचे आशीर्वाद मला मिळाले. बाबा तुम्हाला चांगल्या आरोग्यासाठी खूप शुभेच्छा.